एनआयएकडून कारवाई ः बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, गोव्यात तपास
वृत्तसंस्था / लखनौ
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी 5 राज्यांमधील 17 ठिकाणी छापे टाकले आहेत. या राज्यांमध्ये बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा आणि पंजाब सामील आहे. या राज्यांमध्ये प्रतिबंधित संघटना पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंधित सदस्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. बिहारमधील 12 ठिकाणी तर उत्तरप्रदेशातील 2, मध्यप्रदेश, गोवा अन् पंजाबमधील प्रत्येकी एका ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
बिहारच्या दरभंगामधील डेंटिस्ट डॉ. सारिक रजा अन् शंकरपुरा गावातील महबूबच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. तर मोतिहारीमधील पीएफआय सदस्य सज्जादच्या घरी झडती घेण्यात आली. दरभंगा येथील एनआयएच्या छाप्यापूर्वीच मुख्य आरोपींनी पलायन केल्याचे समोर आले आहे. अटकेतील आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बिहारमध्ये एनआयएकडून कारवाई करण्यात आली आहे. एनआयएने काही काळापूर्वी बिहारमध्ये पीएफआयच्या सदस्यांना अटक करत हल्ल्याचा कट उधळला होता.
केंद्र सरकारने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अधिसूचना जारी करत पीएफआयवर 5 वर्षांची बंदी घातली होती. पीएफआयवर आयएसआयएस यासारख्या जागतिक दहशतवादी संघटनेशी संबंध बाळगण्याचा, दहशतवाद्यांना वित्तपुरवठा तसेच हिंसक कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. पीएफआयवरील बंदीच्या निर्णयाला युएपीएशी संबंधित लवादाने शिक्कामोर्तब केले आहे. पीएफआयवर युएपीए अंतर्गतच बंदी घालण्यात आली आहे.
15 राज्यांमध्ये सक्रिय
बंदी घालण्यात आली असली तरीही पीएफआय अद्याप दिल्ली, आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, केरळ, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू, तेलंगणा आणि मध्यप्रदेशात सक्रिय असल्याचे मानले जाते.









