पुणे / प्रतिनिधी :
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी 8 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
सन 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून, त्याची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 बालकांचे पालकांकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
लॉटरीद्वारे 94 हजार 700 बालकांना प्रवेश जाहीर करण्यात आलेला आहे. लॉटरीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 25 एप्रिल अशी मुदत देण्यात आली होती. आत्तापर्यंत केवळ 13 हजार बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पोर्टल बंद असल्याने अद्यापही बहुसंख्य बालकांचे शाळांमध्ये प्रवेशच निश्चित होऊ शकलेले नाहीत. आता पोर्टल सुरळितपणे सुरू झाले आहे.








