नवीन इमारत बांधण्याच्या हालचाली गतिमान : काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
बेळगाव : बेळगाव आरटीओ कार्यालयाची नूतन इमारत बांधण्याच्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे जुन्या आरटीओ कार्यालयावर सोमवारी जेसीबी फिरविण्यात आला. आता लवकरच या इमारतीच्या कामाला चालना देण्यात येणार आहे. तब्बल 50 वर्षांपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवणारी आरटीओ इमारत पाडण्यास सुऊवात झाली आहे. अनेक वर्षांपासून सरकारच्या तिजोरीत महसूल वाढवून देण्याचे काम याच इमारतीतून झाले होते. मागील 50 वर्षांपासून जिल्ह्याचा आरटीओ कार्यालयाचा कारभार या इमारतीने पाहिला होता. आता आरटीओचा विस्तार केल्यानंतर बेळगाव व खानापूर तालुक्यातील कामकाज इमारतीत सुरू होते.
कोल्हापूर सर्कल येथे आरटीओची जुनी इमारत आहे. त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव केएसआरटीसीकडे पाठविण्यात आला होता. ही प्रक्रिया मागील चार वर्षांपासून सुरू होती. अखेर त्याला मंजुरी मिळाली असून त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथील सर्व कामकाज आता बीएसएनएल कार्यालयात हलविण्यात आले आहे. बेळगावमधील महत्त्वाच्या इमारतींमध्ये आरटीओ कार्यालयाची गणना होते. कोल्हापूर सर्कल येथील या कार्यालयाने सुवर्णमहोत्सवही साजरा केला होता. सध्या ही इमारत पाडविण्याचे काम सुरू झाले असून एका दिवसातच इमारत पाडविली आहे. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या माध्यमातून या कार्यालयाच्या कामकाजाला चालना देण्यात येणार आहे. यासाठीचे टेंडर एका कंपनीला देण्यात आले असून त्याबाबत लवकरच हालचाली सुरू झाल्या आहेत. जुन्या इमारतीच्या खिडक्या, चौकटी व इतर साहित्य यापूर्वीच काढण्यात आले होते. बेळगाव येथील आरटीओ कार्यालय हे स्वातंत्र्यापूर्वीपासून सुरू आहे. मात्र सद्यस्थितीत असणारे कार्यालय हे मागील 50 वर्षांपासून कोल्हापूर सर्कल येथे स्थित आहे. जिल्ह्यात हे एकच कार्यालय कार्यरत होते. आता जिल्ह्यात पाच आरटीओ कार्यालये करण्यात आली आहेत. त्यामुळे बेळगाव आणि खानापूर या दोन तालुक्यांसाठी बेळगाव येथील कार्यालय कार्यरत होते. येत्या दीड ते दोन वर्षांत या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.









