खानापूर : खानापूर मतदारसंघातून भाजपने विठ्ठल हलगेकर यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर ज्येष्ठ नेते बाबुराव देसाई यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. सोमवारी त्यांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेत विठ्ठल हलगेकर यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, अरविंद पाटील, विठ्ठल हलगेकर, तालुकाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, प्रभारी उज्ज्वला बडवाण्णाचे यांनी बाबुराव देसाई यांचे स्वागत केले. य् ाावेळी माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, खानापूर मतदारसंघातून मी, बाबुराव देसाई आणि इतर जण इच्छुक होतो. मात्र, वरिष्ठांनी विठ्ठल हलगेकरांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर थोडी नाराजी पसरली. मी माझ्या कार्यकर्त्यांसह विठ्ठल हलगेकर यांच्या विजयासाठी काम करत आहे. बाबुराव देसाई यांनीही नाराज होत अर्ज दाखल केला होता. त्यांनी कोणत्याही अटीविना आपला अर्ज मागे घेत भाजपासाठी कार्य करणार असल्याचे जाहीर केले. या काळात राजकीय नेते व भाजपचे पदाधिकारी आमिषाला बळी पडले. ते भाजप विरोधात काम करणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र आम्ही प्रामाणिकपणे विठ्ठलराव हलगेकर यांचा विजय करूनच शांत बसणार आहोत.
अनिल बेनके म्हणाले, विठ्ठल हलगेकर यांच्या विजयानंतर खानापूर तालुका भाजपचा बालेकिल्ला म्हणून नावारुपाला येणार आहे. मागील निवडणुकीतील पराभवाचे शल्य आम्ही कदापि विसरणार नाही. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते विठ्ठल हलगेकर यांच्या पाठिशी खंबीरपणे असल्याने भाजपचा विजय निश्चित आहे. खानापूरच्या भाजप प्रभारी उज्ज्वला बडवाण्णाचे म्हणाल्या, तालुक्यातील प्रतिसाद पाहता विरोधकांचे दाबे दणाणले आहेत. त्यामुळे भाजपात फूट असल्याच्या अफवा पसरवत आहेत. भाजपचा झेंडा निश्चित फडकणार आहे. यावेळी उमेदवार विठ्ठल हलगेकर म्हणाले, बाबुराव देसाई भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांची नाराजी मी समजू शकतो. आम्हाला विश्वास होता. बाबुराव देसाई हे निश्चितपणे माघार घेऊन भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करतील. त्यांनी अर्ज मागे घेऊन भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. माजी आमदार अरविंद पाटील, संजय कुबल, प्रमोद कोचेरी, सुरेश देसाई, जि. पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी, धनश्री सरदेसाई, आप्पय्या कोडोळी, वसंत देसाई, अभिजीत चांदीलकर, अशोक देसाई व पदाधिकाऱ्यांमुळे भाजपचा विजय होणार यात शंका नाही. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









