23 कोटी लोक नियमितपणे ऐकतात : ‘आयआयएम रोहतक’कडून सर्वेक्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ला अधिकाधिक भारतीयांनी पसंती दर्शवली आहे. देशातील 100 कोटी जनतेने हा लोकप्रिय कार्यक्रम एकदा तरी ऐकला आहे. तर 23 कोटी लोक ‘मन की बात’ न चुकता ऐकत किंवा पाहत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ‘आयआयएम रोहतक’ने केलेल्या निरीक्षणातून यासंबंधीचा अहवाल जारी करण्यात आला आहे. प्रसार भारतीच्या आदेशानुसार हा अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासासाठी डेटा संकलन हिंदी तसेच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये केल्याचे आयआयएमचे संचालक धीरज शर्मा आणि प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी सांगितले.
‘मन की बात’चे आतापर्यंत 99 भाग झाले असून 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना वेगवेगळ्या घटना आणि संदर्भ ऐकवतात. या कार्यक्रमाची ख्याती दिवसेंदिवस वाढत असून मन की बात बद्दल 96 टक्के लोकांना माहिती असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांचा समावेश होता. हा कार्यक्रम 65 टक्के लोक हिंदीत तर 18 टक्के इंग्रजीत ऐकतात. तसेच 17.6 टक्के लोक रेडिओवर मन की बात ऐकतात. तर, 44.7 टक्के लोक टीव्हीवर आणि 37.6 टक्के लोक मोबाईलवर ‘मन की बात’ पाहतात/ऐकतात. 19 ते 34 या युवा वर्गातील 62 टक्के लोक मोबाईलद्वारेच या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
10,003 लोकांचा सर्वेक्षणात सहभाग
सर्वेक्षण केलेल्या 10,003 लोकांपैकी 60 टक्के पुऊष तर 40 टक्के महिला होत्या. हे लोक 68 वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित आहेत. यापैकी 64 टक्के लोक अनौपचारिक आणि स्वयंरोजगाराशी संबंधित होते. तर 23 टक्के विद्यार्थी होते. भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही भागात सर्वेक्षण करण्यात आले असून प्रत्येक भागातील साधारणपणे अडीच हजार जणांशी संवाद साधून सदर अहवाल तयार करण्यात आला आहे.
येत्या रविवारी 100 वा भाग
मन की बात कार्यक्रम 22 भारतीय भाषा आणि 29 बोलींव्यतिरिक्त इंग्रजी वगळता 11 परदेशी भाषांमध्येही प्रसारित केला जातो. ऑल इंडिया रेडिओच्या 500 हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे मन की बात प्रसारित केली जात आहे. पंतप्रधानांची मन की बात 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झाली आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केली जाते. 30 मिनिटांचा हा कार्यक्रम 30 एप्रिल 2023 रोजी 100 भाग पूर्ण करत आहे.









