मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमध्ये ईडीचे छापासत्र सुरूच आहे. राजकीय नेत्यांबरोबरच काही प्रशासकीय अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील उदय शंकर नामक अधिकारी केंद्रीय अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या रडारवर आला आहे. रांचीसह इतर अनेक ठिकाणी ईडीकडून उदय शंकर यांच्या विरोधात झारखंडमध्ये तपास यंत्रणा शोधमोहीम राबवत आहे.
तपास यंत्रणेच्या सूत्रानुसार, हे प्रकरण जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि सरकारी पैशांची फसवणूक करून मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. उदय शंकर आणि अभिषेक श्रीवास्तव असे दोघेजण सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. झारखंडच्या राजकीय वर्तुळात अभिषेक श्रीवास्तव यांचे खूप जवळचे संबंध आहेत. लवकरच तपास यंत्रणा त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवू शकते. उदय शंकरच्या ठिकाणच्या शोधमोहिमेवेळी महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. संशयित आरोपी अधिकाऱ्याच्या घरातून त्याच्या मोबाईल फोनसह इतर अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. याच तपासादरम्यान झारखंडमधील एका खासदाराच्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे आणि अनेक लोकांशी देवाणघेवाण झाल्याची माहितीही मिळाली आहे. यासंदर्भातील तपास पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच तपासादरम्यान लाखो कोटींच्या व्यवहारांची माहितीही मिळाली आहे.









