लोणावळा / वार्ताहर :
मावळ तालुक्यातील पवना धरणात रविवारी दुपारी बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आज दुपारी बचाव पथकांना यश आले. कालपासून ही शोधमोहीम सुरु होती. आज स्कूबा ड्राईव्हच्या माध्यमातून पाण्याच्या तळाशी जाऊन शोध घेण्यात आला. अखेर आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले. लोणावळय़ातील शिवदुर्ग मित्र मंडळ, मावळातील वन्यजीव रक्षक समिती व खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या सर्वांनी यासाठी संयुक्त मोहिम राबवली.
परेल मुंबई येथील 18 पर्यटकांचा समुह काल रविवारी पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आला होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक पवना धरणाच्या जलाशयात उतरले असता पर्यटकांपैकी साहिल विजय सावंत (वय 18) हा पाण्यात बुडाला. यावेळी इतर सदस्यांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच लोणावळय़ात शिवदुर्ग रेस्कू पथक व मावळ वन्यजीव रक्षक समिती यांना संपर्क साधला. दोन्ही रेस्कू पथकांनी काल सायंकाळी अंधार पडेपर्यंत शोधमोहिम राबवली. मात्र यश आले नाही. आज सकाळी पुन्हा ही शोधमोहिम राबविण्यात आली होती. तिन्ही बचाव पथकांनी शर्तीचे प्रयत्न करत साहिलचा मृतदेह पाण्यातून शोधून बाहेर काढला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.