पुणे / प्रतिनिधी :
साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर येथे आगामी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषद येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या संमेलनासाठी सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना अशा चार ठिकाणांहून निमंत्रणे साहित्य महामंडळाकडे आली होती. महामंडळाच्या स्थळ निवड समितीने औदुंबर आणि अंमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. सातारा येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा या संस्थेचे दृक-श्राव्य सादरीकरण पाहिले. या तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता याचा विचार करून सर्वानुमते अंमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ या संस्थेची शिफारस करण्यात आली. त्याला साहित्य महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी उद्गीर येथे साहित्य संमेलन झाले असल्याने आगामी संमेलनासाठी मराठवाड्यातील जालना या स्थळाचा विचार करण्यात आला नाही, असे साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डाॅ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
साहित्य महामंडळाच्या बैठकीस महामंडळाच्या अध्यक्षा डाॅ. उषा तांबे, महामंडळाच्या कार्यवाह डाॅ. उज्ज्वला मेहेंदळे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, सुनीताराजे पवार, डाॅ. किरण सगर आणि डाॅ. नरेंद्र पाठक या स्थळ निवड समितीसह प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डाॅ. विद्या देवधर, अ. के. आकरे आणि प्रकाश गर्गे उपस्थित होते. दरम्यान, वर्धा येथील साहित्य संमेलनाचे सूप वाजले त्याला जेमतेम ८० दिवस झाले असताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आगामी ९७ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ जाहीर केले गेले. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.








