शिवजयंतीची शाही दरबार मिरवणूक अपूर्व उत्साहात
प्रतिनिधी/ कराड
राज्यात वैशिष्ट्यापूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराडमधील पारंपरिक तिथीनुसार शिवजयंतीची शाही दरबार मिरवणूक रविवारी सायंकाळी येथे अपूर्व उत्साहात पार पडली. मिरवणुकीतील सहभागी व मिरवणूक पाहायला आलेल्या लाखावर जनसमुदायाने हा सोहळा अनुभवताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. रात्री उशिरा दत्त चौकात या मिरवणुकीची सांगता झाली.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेतील पांढरीच्या मारूती मंदिरजवळ मिरवणुकीस प्रारंभ झाला. डॉ. अतुल भोसले, हिंदू एकताचे विनायक पावसकर, विक्रम पावसकर, माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, हणमंत पवार, फारूक पटवेकर, सागर बर्गे, दादा शिंगण, एकनाथ बागडी, मुपुंद चरेगावकर, चंद्रकांत जिरंगे, अतुल शिंदे यांच्यासह शिवभक्तांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा प्रारंभ झाला. प्रारंभी ढोलपथक, रायगडची प्रतिकृती असणारी शिवकन्या रिक्षा, बॅण्ड, पालखीतील शिवमूर्ती, हलगी पथक, वारकरी पथक, अश्वारूढ छत्रपती शिवराय व मावळे, रथातील छत्रपती शिवाजी महाराज, अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, श्री राम, हनुमानाची भव्य मूर्ती, फेटेधारी महिला, त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्ररथ असा मिरवणुकीचा लवाजमा होता.
सायंकाळी सातला मिरवणूक सुरू झाल्यानंतर संपूर्ण शहरात शिवमय वातावरण झाले होते. शहरातील विविध भागात तसेच मिरवणूक मार्गावर अनेक मंडळांनी डीजे लावले होते. त्यामुळे शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पांढरीचा मारूती ते कमानी मारूती या रस्त्यावर हजारोंची गर्दी होती. तशीच गर्दी चावडी चौक ते दत्त चौक या रस्त्यावर होती. सायंकाळनंतर तालुक्यातील गावोगावचे तरूणांचे जत्थे मुख्य रस्त्याने चालत मिरवणुकीत सहभागी होत होते. त्यामुळे मिरवणूक मंगळवार पेठेत असताना दत्त चौकापासून रस्ता गजबजलेला होता. मिरवणुकीत भगवे फेटे घातलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. नागरिक व तऊण मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी होत होते.
मिरवणूक चावडी चौकमार्गे पुढे येत असताना मिरवणुकीचा उत्साह टिपेला पोहोचला होता. मिरवणुकीसाठी कराडसह बाहेरील पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला होता. प्रचंड आतिषबाजी व छत्रपती शिवरायांच्या जयघोषने कराड शहर दुमदुमून गेले.








