दोन्ही संघांना फलंदाजांकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था / हैदराबाद
दिल्ली कॅपिटल्स सोमवारी येथे सनरायजर्स हैदराबादशी लढणार असून आपल्या पहिल्या विजयाची नोंद केलेल्या दिल्लीला यावेळी त्यांच्या फलंदाजांकडून अधिक अपेक्षा असतील, तर हैदराबाद जिंकण्याच्या मार्गावर परतण्याच्या दृष्टीने या संधीचा फायदा घेण्यास उत्सुक असेल.
दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंतचा हंगाम कठीण गेला आहे. त्यांना सर्वच विभागांमध्ये संघर्ष करावा लागलेला असून पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागलेला आहे. तथापि, डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघाने गुऊवारी कोलकाता नाईट रायडर्सवर 4 गडी राखून मात करत आपला पहिला विजय नोंदवलेला आहे. त्यांच्या गोलंदाजांनी केकेआरला 127 वर रोखताना उत्कृष्ट प्रदर्शन घडविले. परंतु कर्णधार वॉर्नर व अक्षर पटेल वगळता दिल्लीचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. दिल्लीच्या संघाला पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण या मोसमात आतापर्यंत या दोघांकडून खूपच निराशाजनक कामगिरी घडलेली आहे. त्यामुळे व्यवस्थापन त्यांना कायम ठेवते की, रोव्हमन पॉवेल आणि रिली रॉसो यासारख्यांना आणखी एक संधी दिली जाते हे पाहावे लागेल.
युवा भारतीय फलंदाज धडपडत असल्याने मध्यफळीत अनुभवी मनीष पांडेवरील जबाबदारी वाढली असून तो जबाबदारी जाणून खेळल्यास अक्षरला फटकेबाजीचे स्वातंत्र्य मिळू शकेल. मोसमातील आपला पहिला सामना खेळताना अनुभवी इशांत शर्माने शानदार गोलंदाजी केलेली असून दिल्लीच्या बाकीच्या गोलंदाजांनीही त्याला चांगली साथ दिली. कमी स्ट्राइक रेटमुळे टीका झालेला कर्णधार वॉर्नर ‘केकेआर’विऊद्ध त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला. सोमवारी देखील तो अशाच प्रकारे खेळेल, अशी आशा संघ व्यवस्थापन बाळगून आहे.
दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबादला एकामागून एक पराभव पत्करावे लागलेले असून ते सध्या सहा सामन्यांतून चार गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांचा संघ कागदावर चांगला दिसत असला, तरी त्यांची फलंदाजी अपयशी ठरलेली आहे. त्यांच्या फलंदाजांना मागील दोन सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करता आलेला नाही किंवा चांगली धावसंख्या उभारता आलेली नाही. तरीही संघात भरपूर ‘मॅच व्हिनर्स’ असल्याने त्यांना त्यांची मोहीम पुन्हा ऊळावर येण्याची आशा आहे.
संघ : दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, सर्फराज खान, अमन हकीम खान, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, खलील अहमद, कुलदीप यादव, रोवमन पॉवेल, रिली रॉसो, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिझूर रहमान, चेतन साकारिया, मुकेश कुमार, फिल सॉल्ट, लुंगी एनगिडी, प्रवीण दुबे, ललित यादव, रिपल पटेल, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मनीष पांडे, कमलेश नागरकोटी आणि यश धुल. सनरायजर्स हैदराबाद : एडन मार्करम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलीप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, फझलहक फाऊखी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिच क्लासेन, आदिल रशिद, मयंक मार्कंडे, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयंक डागर, नितीशकुमार रेड्डी, अकेल होसेन, अनमोलप्रीत सिंग.









