वृत्तसंस्था/ अँटेलिया
येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्टेज 1 तिरंदाजी स्पर्धेत रविवारी भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने रौप्यपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात चीनने भारताचा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. 2010 पासून भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाला विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक हुलकावणी देत आहे. यावेळीही पुन्हा भारतीय तिरंदाजपटूंना सुवर्णपदक हुकले. पुरुष सांघिक रिकर्व्ह प्रकारातील अंतिम लढतीत चीनने भारताचा 5-4 (55-54, 56-50, 58-59, 55-56, 28-28) असा पराभव केला. अँटेलियात सुरू असलेल्या विश्वचषक स्टेज 1 तिरंदाज स्पर्धेत आतापर्यंत भारताने दोन सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण तीन पदके मिळवली आहेत. रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात भारताच्या धीरजने पदकासाठीच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. पुरुषांच्या सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात तरुणदीप राय, अतेनू दास आणि बी. धीरज यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात भारताने 5 सुवर्णपदके मिळवली आहे. 2008 साली भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवले होते. तर भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने पुरुषांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात शेवटचे सुवर्णपदक 2010 साली शांघायमध्ये मिळवले होते









