आठ देशांच्या राजदुतांसह 40 देशांतील अनिवासी भारतीयांची उपस्थिती
वृत्तसंस्था/ अयोध्या
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अयोध्येतील राम मंदिरावर 155 देशांच्या जलाने अभिषेक करण्यात आला. त्यात अमेरिकेतील 14 मंदिरे आणि 12 नद्यांच्या पाण्याचाही समावेश आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 8 देशांचे राजदूत आणि 40 देशांतील अनिवासी भारतीय अयोध्येत पोहोचले होते. या जलाभिषेखादरम्यान सर्वप्रथम हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.
दिल्ली भाजपचे माजी आमदार विजय जॉली यांच्या पुढाकाराने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीतर्फे जलाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जलाभिषेकसाठी 155 देशांतून पाण्याचे कलश अयोध्येत आणण्यात आले होते. त्यात उझबेकिस्तानमधील ताश्कंदमधील चिरचिक नदी, ताजिकिस्तानमधील वख्श नदी, युव्रेनमधील डनिस्टर, रशियातील व्होल्गा, मॉरिशसमधील गंगा तलाव आणि हिंदी महासागरातील पाण्याचाही समावेश आहे.
5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले होते. त्यानंतर 1000 ठिकाणचे पाणी गर्भगृहाला अर्पण करण्यात आल्याचे मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले. जलाभिषेक कार्यक्रमासाठी इतक्मया देशांतून पाणी गोळा करायला 31 महिने लागले. स्टॉकहोम येथील आशिष ब्रह्मभट्ट यांनी कोरोना कालावधीनंतरच्या पहिल्या विस्तारा फ्लाईटमध्ये पाणी पाठवले. आम्ही युव्रेन-रशियासह चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडूनही पाणी मागवले आहे. जलाभिषेक कार्यक्रम हा श्री रामावरील अथक भक्तीचा परिणाम आहे. श्रीराम वैश्विक असून त्यांच्या मंदिराला संपूर्ण जगाचा पाठिंबा असल्याचेच यातून स्पष्ट होत असल्याचे राय यांनी स्पष्ट केले.









