रतलाम-इंदूर डेमू ट्रेन 10 किमीपर्यंत प्रवास : इंजिनसह एका बोगीला आग
वृत्तसंस्था/ इंदोर
रतलामहून इंदोरला जाणाऱ्या डेमू ट्रेनमध्ये रविवारी सकाळी भीषण आगीची दुर्घटना घडली. रतलाम-आंबेडकर नगर डेमू ट्रेनमधील (09390) एका बोगीसह इंजिनला आग लागलेली असताना ही टेन सुमारे 10 किलोमीटर धावत राहिली. सुरुवातीला ड्रायव्हिंग मोटर कोचमध्ये (इंजिन) आग लागली. या आगीमुळे शेजारील बोगीही आगीच्या विळख्यात सापडली. सुदैवाने आगीची वेळीच माहिती मिळाल्याने रेल्वे थांबताक्षणी प्रवासी खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डेमू ट्रेन रतलाम येथून सकाळी 6.35 वाजता डॉ. आंबेडकर नगरसाठी निघाली. रतलामपासून नौगवान स्टेशन 17 किमी अंतरावर आहे. येथून क्रॉस करताना गाडी 4 ते 5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ड्रायव्हिंग मोटर कोचच्या जनरेटरमधून ठिणग्या उठताना दिसल्या. हा डबा ट्रेनमधील प्रवासी बोगीजवळ होता. वाऱ्यामुळे आग लगतच्या बोगीत वेगाने पसरली. इंजिनमधून आगीच्या ज्वाळा उठत असल्याचे पाहून शेजारील बोगीतील प्रवासी घाबरले. त्यांनी साखळी ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच दरम्यान सकाळी सातच्या सुमारास ट्रेन प्रितमनगर स्थानकात थांबली. नौगाव ते प्रितमनगर हे अंतर 17 किलोमीटर आहे.
ट्रेन थांबताच प्रवासी गडबडीने उतरले. तेवढ्यातच इंजिनला जोडलेल्या बोगीलाही आगीने पूर्णपणे वेढले होते. याचदरम्यान अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सकाळी 8.10 च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत ड्रायव्हिंग मोटर कोच आणि एक बोगी पूर्णपणे जळून खाक झाली. ड्रायव्हिंग मोटर कोचच्या जनरेटरमध्ये आग लागल्यानंतर ती बोगीमध्ये पसरल्याचे रतलाम रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी खेमराज मीणा यांनी सांगितले.









