आसाममधील तुरुंगात रवानगी ः तणाव टाळण्यासाठी पोलिसांकडून दक्षता
वृत्तसंस्था/ मोगा, अमृतसर
गेल्या 36 दिवसांपासून फरार असलेला ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अखेर पंजाब पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. रविवारी सकाळी 6.45 वाजता मोगा जिह्यातील रोडे गावातील गुरुद्वारातून त्याला अटक केली. यानंतर पंजाब पोलिसांनी भटिंडा येथील एअरफोर्स स्टेशनमधून त्याची रवानगी आसाममधील दिब्रुगड कारागृहात केली. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अमृतपालला दिब्रुगड तुरुंग प्राधिकरणाच्या ताब्यात दिले. दुसरीकडे, अमृतपालच्या अटकेनंतर मोगा जिह्यात तणावाचे वातावरण आहे. येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याबरोबरच विशेष दलाचे संचलनही करण्यात आले.
अमृतपालने स्वतः आत्मसमर्पण केल्याचीही चर्चा आहे. आत्मसमर्पणानंतर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर अटकेची रितसर कारवाई करण्यात आल्याचे समजते. अटकेच्या कारवाईपूर्वी रविवारी सकाळी त्याने मोगा जिह्यातील रोडे गावातील गुरुद्वारामध्ये कपडे बदलले, पाठ केले, उपस्थितांना संबोधित केले आणि अटकेचे कारणही सांगितले. त्यानंतर त्याने गुरुद्वारा साहिबच्या बाहेर जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. अमृतपालला अटक केल्यानंतर पंजाब पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली. अमृतपालला मोगा येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यासोबतच पोलिसांनी लोकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच लोकांना कोणत्याही फेक न्यूज शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अमृतपाल मोगाच्या गुरुद्वारात पोहोचला होता. फरार असताना अमृतपालने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा व्हिडिओ जारी केले होते. तसेच त्याच्या हस्तकांना अटक करण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आता अमृतपालही जाळय़ात सापडला आहे. त्याच्या सर्व साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदारांची सतत चौकशी सुरू होती. तसेच पोलिसांनी पत्नीवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्यानंतरच आता अमृतपालही सुरक्षा यंत्रणांच्या तावडीत सापडला आहे. अमृतपालची रवानगी दिब्रुगड तुरुंगात करण्यात आली आहे.
अमृतपाल 18 मार्चपासून फरार
सर्वप्रथम, 18 मार्च रोजी पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्या अनेक साथीदारांना अटक केली मात्र अमृतपाल पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा सतत शोध घेत होते. मात्र तो सतत वेश बदलून पोलिसांपासून पळून जात होता. त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) दाखल करण्यात आला असून अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते.
पोलिसांकडून योग्य नियोजन
अमृतपालच्या जवळच्या मित्रांनी पंजाब पोलिसांना त्याच्या आत्मसमर्पण योजनेबद्दल सांगितले होते. गर्दी जमल्यास वातावरण बिघडू शकते, अशी भीती पोलिसांना होती. त्यामुळे साध्या वेशातील पोलीस गुरुद्वारापर्यंत पोहोचले होते. पोलिसांवर 35 दिवसांपासून दबाव निर्माण झाला होता. इंटेलिजन्स विंगला अमृतपाल रोडे गावात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार योग्य नियोजन करून पोलिसांच्या विशेष पथकाने रितसरपणे कारवाई केल्याचे पंजाब पोलीस दलातील आयजी डॉ. सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले.
शरणागती ही अभिमानाची बाब
गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल आपल्या संपर्कात नव्हता, असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. तसेच अमृतपालला भेटण्यासाठी दिब्रुगडला जाणार असल्याचेही जाहीर केले. आपला मुलगा शरण गेला ही अभिमानाची बाब आहे. आता बेकायदेशीरपणे पकडलेल्यांना सरकारने सोडावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘वारीस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपालवर 3 गुन्हे दाखल असून त्यापैकी दोन प्रकरणे अमृतसर जिह्यातील अजनाळा पोलीस ठाण्यात आहेत. आपल्या एका जवळच्या मित्राच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या अमृतपालने त्याच्या समर्थकांसह 23 फेब्रुवारी रोजी अजनाळा पोलीस स्टेशनवर हल्ला केला. याप्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याने पंजाब पोलिसांवर बरीच टीका सुरू होती. अजनाळा पोलीस ठाण्यावरील हल्ल्याशी संबंधित गुन्हय़ात ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर 3 गुन्हे दाखल असून 2 द्वेषपूर्ण भाषणाशी संबंधित आहेत.









