मुलींच्या रक्ताने स्नान करण्याचा होता शौक
जगात असे अनेक क्रूर पुरुष राहिले आहेत, ज्यांनी हजारो लोकांचा जीव घेतला आहे. इतिहासात असे अनेक राजे-महाराजे आणि सीरियल किलर होऊन गेले आहेत, ज्यांना लोकांना मारण्यात मजा वाटायची. परंतु कधी तुम्ही एखाद्या महिलेच्या अशा क्रूर कृत्याबद्दल ऐकले आहे का? इतिहासाच्या पानांमध्ये स्वतःच्या क्रौर्यासाठी कुख्यात असलेल्या महिलांची नावे नोंद आहेत. अशाच एका महिलेला सर्वात क्रूर महिला ठरविण्यात आले आहे. या महिलेने स्वतःच्या आयुष्यात सुमारे 600 मुलींचा जीव घेतला होता, या महिलेला एखाद्याचा जीव घेण्यास मजा वाटायची. हंगेरीतील एलिझाबेथ बॅथोरी असे या महिलेचे नाव होते.
एलिझाबेथ बॅथोरीचा जन्म 1560 साली झाला होता. धनाढय़ कुटुंबाची सदस्य असल्याने तिच्या घरात नेहमीच नोकर-चाकर तिच्या सेवेसाठी तैनात असायचे. अधिक धनसंपन्न असल्याने ती इतरांना स्वतःचा दास मानायची आणि त्यांचा छळ करायची. एखादी मुलगी तिच्याहून सुंदर भासल्यास एलिझाबेथ तिला ठार करत होती. वयाच्या 15 व्या वर्षी तिचा फेरेंक नडास्डीसोबत विवाह झाला होता. या विवाहातून तिला 4 मुले देखील झाली. एलिझाबेथला युवतींची हत्या करण्याचा छंद होता. या युवतींच्या रक्ताला शरीरावर फासल्याने तारुण्य दीर्घकाळ टिकेल असे तिचे मानणे होते.

महालात हत्यासत्र
एलिझाबेथने स्वतःच्या पतीसमोरच अनेक युवतींना ठार केले होते आणि मग त्यांच्या रक्ताद्वारे स्नान केले हेते. तिने स्वतःच्या महालात हत्यांमध्ये मदत करणारे नोकर बाळगले होते. वयाच्या 48 व्या वर्षी पतीची हत्या झाल्यावर ती उत्तर-पश्चिम हंगेरीच्या महालात वास्तव्यास गेली होती. अन्य महिलांचा छळ करणे तिचा छंद होता. गरीब घरातील युवतींना प्रलोभने दाखवून महालात बोलावायचे आणि मग त्यांची हत्या करण्याचे सत्र तिने आरंभिले होते.
1610 साली हंगेरीचा राजा मॅथियस द्वितीयने एलिझाबेथच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीनंतर एलिझाबेथने महालात सुमारे 80 युवतींना मारल्याचे समोर आले होते. तर प्रत्यक्षदर्शींनुसार एलिझाबेथने 600 हून अधिक युवतींचा जीव घेतला होता. एलिझाबेथच्या नोकरांना मृत्युदंड ठोठावण्यात आला होता, परंतु धनाढय़ अन् उच्चभ्रू वर्गातील असल्याने एलिझाबेथला केवळ एका खोलीत जगण्याची शिक्षा मिळाली होती. 1614 मध्ये एलिझाबेथचा मृत्यू झाला होता. तेव्हपासून ती इतिहासातील सर्वात धोकादायक महिला सीरियल किलर म्हणून कुख्यात आहे.









