युद्धाच्या भीतीदरम्यान निवडणूक नको ः संरक्षणमंत्री
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पंजाबमध्ये निवडणूक घेण्यास विलंब होण्यामागे भारतासोबत युद्धाची शक्यता कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. पंजाब प्रांतात निवडणूक घेतल्याने देशात अस्थिरता वाढणार आहे. यामुळे भारताला जल विवाद अन् अनेक मुद्दय़ांवर लाभ उचलण्याची संधी मिळणार असल्याचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.
निवडणूक घेण्यात आल्यास पाकिस्तान ‘ग्लोबल ग्रेट गेम’चा पुन्हा शिकार ठरेल, ज्यात भारताची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय पाकिस्तानच्या सरकारने व्यक्त केला आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवाद, अस्थिरता, दहशतवादाचा धोका, पाकिस्तानात परतत असलेले इस्लामिक स्टेटचे दहशतवादी, भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ आणि युद्धाच्या धोक्या सामोरा जात आहे. अशा स्थितीत निवडणूक करविणे देशहिताचे नसल्याचे शाहबाज शरीफ यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात नमूद पेले आहे.
ऑक्टोबर व्हावी निवडणूक
पाकिस्तानात दीर्घकाळापासून पंजाब निवडणुकीवरून उलथापालथ सुरू आहे. शाहबाज शरीफ यांचे सरकार ही निवडणूक ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलू पाहत आहे. तर माजी पंतप्रधान इम्रान खान हे लवकरात लवकर निवडणूक घेतली जावी अशी मागणी करत आहेत. याकरता त्यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाच्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने निवडणूक आयोगाला मे महिन्यात निवडणूक करविण्याचा आदेश दिला आहे. पंजाब प्रांतात निवडणुकीसाठी सरकारने 21 अब्ज रुपये निवडणूक आयोगाला द्यावेत असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच याकरता 10 एप्रिलपर्यंतची कालमर्यादा निश्चित केली होती. परंतु सरकारने न्यायालयाचा आदेश मान्य करण्यास नकार देत निवडणूक आक्टोबर महिन्यात करविण्यासंबंधी याचिका दाखल केली आहे.
निवडणुकांचा खर्च पेलणार नाही
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान शाहबाज सरकारने एक अहवाल सोपविला असून यात भारतासोबत युद्धाची भीती हे देखील निवडणूक न करविण्याचे कारण असल्याचे म्हटले आहे. याचाच दाखला देत संरक्षणमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाला निवडणुकीच्या तारखेचा आदेश मागे घेण्याचे आवाहन केले आहे. ऑक्टोबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे, तेव्हाच चारही प्रांतांमध्ये विधानसभा निवडणूक घेतली जावी असे शाहबाज शरीफ सरकारचे म्हणणे आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती बरी नाही, अशा स्थितीत दोनवेळा निवडणूक घेण्याचा खर्च देशाला पेलवणारा नाही. तसेच पाकिस्तानात राजकीय अन् सुरक्षास्थिती चांगली नसल्याचे सरकारने म्हटले आहे.









