वृत्तसंस्था/ जेरुसालेम (इस्त्रायल)
भारताचा 21 वर्षीय जलतरणपटू आर्यन सिंग दादीयालाने इस्त्रायलमधील गॅलिले समुद्र पार करत विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. प्रतिकूल हवामान आणि प्रचंड सागरी लाटा या समस्यांना तोंड देत आर्यन सिंगचा हा विक्रम कौतुकास्पद म्हणावा लागेल.
गॅलिलेचा समुद्र हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात खोल समुद्र म्हणून ओळखला जातो. त्याचा पृष्ठभाग समुद्र सपाटीपासून 214 मी. खोलवर आहे. या समुद्रामध्ये प्रचंड सागरी लाटा आणि वादळी वारे सातत्याने वाहत असल्याने आर्यन सिंगची ही कामगिरी निश्चितच दर्जेदार म्हणावी लागेल. आर्यन सिंगने यापूर्वी म्हणजे 2022 च्या नोव्हेंबरमध्ये गोव्यामध्ये 32 कि.मी. सागरी जलतरण अंतर पाच तास 36 मिनिटांच्या कालावधीत पार करत विश्वविक्रम केला होता. यानंतर गॅलिलेचा समुद्र पार करणारा तो आशियातील पहिला जलतरणपटू आहे. शुक्रवारी आर्यन सिंग दादीयालाने इस्त्रायलमधील आपल्या सागरी जलतरण मोहिमेला प्रारंभ केला. 2017 साली गाय कोहेनने सातव्या प्रयत्नात गॅलिलेचा समुद्र पार करण्याचा पहिला विश्वविक्रम नोंदवला होता. आता आर्यन सिंगने पहिल्याच प्रयत्नात इस्त्रायलमधील गॅलिलेचा समुद्र पार करण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. गॅलिले मॅरेथॉन जलतरण संघटना तसेच इस्त्रायलमधील भारताचे राजदूत पवन पाल यांनी इस्त्रायलमधील आपल्या भारतीय वकिलाती कार्यालयातून या मोहिमेवेळी आपली उपस्थिती दर्शवली होती. आर्यन सिंगने या आपल्या मोहिमेत 20.5 कि.मी. अंतर 6 तास 15 मिनिटात पार केले. जलतरणपटू आर्यन सिंग दादीयालाचे संपूर्ण कुटुंब तसेच जलतरण प्रशिक्षक राहुल चिपळूणकर, गाईड सुबोध सुळे, पवित्रा पोईलकर यांनी या मोहिमेवेळी आपली उपस्थिती इस्त्रायलमध्ये दर्शवली होती. 2018 साली आर्यन सिंग अमेरिकेतील स्पिरे इन्स्टिट्यूट आणि अकादमीमध्ये दोन वर्षासाठी दाखल झाला होता. त्यानंतर आर्यन सिंग दादीयाला हा भारताचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून ओळखला गेला.









