वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने शनिवारी बंगालच्या उपसागरात नेव्हल बेस्ड एंडो-एटमॉस्फेरिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची पहिली उ•ाण चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ घेण्यात आलेल्या या चाचणीचा उद्देश शत्रूच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा धोका कमी करणे हा होता. या कार्यक्षमतेमुळे भारतीय नौदल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली क्षमता असलेल्या देशांच्या लीगमध्ये सामील झाले आहे. याआधी जमिनीवरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. चाचणी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रात बसवलेले स्वदेशी साधक आणि बूस्टर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. भारताच्यादृष्टीने ही मोठी उपलब्धी असून संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाप्रती आमची वचनबद्धता मजबूत करत असल्याचे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.









