ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा समुद्री हल्ल्यात बुडालेल्या जहाजाचा पत्ता लावण्यात यश आले आहे. समुद्राच्या तळाशी या जहाजाचे अवशेष तब्बल 81 वर्षांनंतर मिळाले आहेत. या जहाजावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यात 1,060 कैदी होते. ते सर्वजण जहाजाबरोबरच समुद्राच्या तळाशी गेले. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहू शकला नाही. दुसऱया महायुद्धातील अनेक शोकांतिकांपैकी ही एक महत्वाची शोकांतिका मानली जाते. हे जहाज जपानी बनावटीचे होते.

त्याचे अवशेष दक्षिण चीनी समुद्रात मिळाले आहेत. त्यांचा शोध एका ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱया सामाजिक संस्थेने लावला आहे. सायलेंट वर्ल्ड फाऊंडेशन असे या संस्थेचे नाव आहे. हे अवशेष जसेच्या तसे जपण्यात येणार आहेत. त्यांच्या आजच्या स्वरुपात कोणतेही परिवर्तन केले जाणार नाही. या जहाजात जे मानवी अवशेष आहेत, तेही जसेच्या तसे राखले जाणार आहेत. या जहाजाचा शोध ‘टायटॅनिक’ जहाजापेक्षाही जास्त खोलवर लागला आहे. या जहाजावर जे कैदी होते, ती सर्व सामान्य माणसे नव्हती. तर त्यांच्यात 850 लोक ऑस्ट्रेलियाचे सैनिक होते. तर 129 सर्वसामान्य नागरीक होते. तसेच जहाजावर 14 देशांचे एकंदर 210 नागरीकही होते. हे जहाज न्यूगिनी पापुआ येथून या कैद्यांना घेऊन चीनच्या हैनान प्रांताकडे निघाले होते. या जहाजावर एका अमेरिकन पाणबुडीने ती जपानची युद्धनौका आहे, असे समजून हल्ला केला होता. युएसएस स्टर्जियन या पाणबुडीने या जहाजावर चार टार्पेडोंचा मारा केला. हा हल्ला एवढा अचूक होता की तो झाल्यापासून अवघ्या 11 मिनिटांमध्ये हे जहाज बुडाले होते. त्यामुळे कैद्यांना वाचविण्याची संधी मिळाली नव्हती. आजही या शोकांतिकेची चर्चा काही निमित्ताने होत असते.









