दिवाळीनंतर कारखाना विस्तारीकरणाचा नारळ फोडणार; ‘तरुण भारत संवाद’ कडे मांडला अजेंडा
कोल्हापूर प्रतिनिधी
माजी आमदार महादेवराव महडिक यांच्या नेतृत्वाखाली गेली 27 वर्ष छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना उत्तमरीत्या सुरु आहे. राजाराम महाराजांनी ज्या उदात्त हेतूने कारखान्याची स्थापना केली, त्याची जाण ठेऊनच आजपर्यंत महाडिक साहेबांनी कारखाना सांभाळला आहे. केवळ विरोध आणि महाडिक द्वेषातून विरोधक आरोप करत आहेत. पण कारखान्याचे सुज्ञ सभासद सहकार जपणाऱ्या महाडिक साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील याचा आम्हाला विश्वास असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी तरुण भारत संवाद सोबत बोलताना सांगितले. तसेच दिवाळीनंतर कारखाना विस्तारीकरणाचा नारळ फोडणार असून यानंतर कारखान्यामध्ये सभासद आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी देणारे असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
माजी आमदार महाडिक म्हणाले, महाडिकांनी 27 वर्षाच्या कारभारात कधीही कारखान्याच्या कामगारांचे पगार थकवले नाहीत. राजकारण डोक्यात ठेऊन कर्मचाऱ्यांची बदली केली नाही. ज्याच्या-त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सर्वांना न्याय देण्याचे काम महाडिक साहेबांनी केले आहे. ऊस बिले वेळेत, कर्मचारी पगार वेळेत, सभासद साखर वेळेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चोख काटा व काटकसरीचा कारभार यामुळे सभासद, कर्मचारी सर्वांचाच आमच्या कारभारावर दृढ विश्वास आहे. याची प्रचिती येणाऱ्या 25 तारखेला पुन्हा येईल. सहकार आघाडीचे सर्व 21 उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील.
कारखाना सभासदांचा ठेवणार सहकार जपणार
विरोधकांनी पहिल्या 3 वर्षातच स्वत:च्या ताब्यातील कारखान्याचे नाव बदलले. एका रात्रीत 5629 सभासद कमी केले. महाडिकांनी 27 वर्षात कधीही कोणाच्या सभासदत्वाला नखही लावलं नाही. सहकार जपण्याचं काम केलं. त्याच पद्धतीने पुढील काळातही सहकार जिवंत ठेवण्याचं काम आम्ही करू. हा कारखाना सभासदांचाच राहिला पाहिजे, यासाठीही पुढील काळात प्रयत्नशील राहणार आहे.
दोन वर्षांत विस्तारीकरणाचे काम पूर्ण
विरोधकांनी कायम विस्तारीकरणाला विरोध केला, आज तेच विस्तारीकरण का केलं नाही? असा प्रश्न विचारात आहेत. त्यांची ही दुटप्पी भूमिका सभासद ओळखून आहे. विस्तारीकरणाच्या सर्व परवानग्या शासन दरबारी मंजूर झाल्या आहेत. आवश्यक अर्थसहाय्याला मंजुरी मिळालेली आहे. दिवाळीला विस्तारीकरणचा आमचा निर्धार पूर्णत्वास येईल. त्यानंतर निश्चितपणे राजाराम कारखान्याची गणना जिह्यामध्ये जास्त दर देणाऱ्या कारखान्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये होईल.
सभासद, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देणार
विस्तारीकरण आणि 18 मेगावॅट को-जेनेरेशन प्रकल्प उभारणी झाल्यानंतर निश्चितपणे रोजगार उपलब्ध होतील. यामध्ये सभासद शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिह्यात अतिवृष्टी आणि महापुर या मोठ्या समस्या आहेत. यामुळे प्रतिवर्षी सभासदांच्या पिकाचे नुकसान होते. अश्या परिस्थितीत शेतीसोबतच सभासदांना आर्थिक जोड मिळवून देण्याच्या हेतूनेच हा निर्णय घेतलेला आहे.
साखरही न देणारे आश्वासन देत आहेत
डी.वाय.पाटील साखर कारखान्यात उरल्यासुरल्या 2200 सभासदांना शेअर्सची साखर दिली जात नाही. मात्र ते राजारामच्या सभासदांना शेअर्सची साखर वाढवून देण्याचे आश्वासन देत आहेत. ही हास्यास्पद आणि विरोधाभास दर्शवणारी बाब आहे. आम्ही राजाराम कारखान्यात प्रतिमहिना 5 रुपयाने 5 किलो साखर देतो. दिवाळीची 3 किलो साखर त्याच दराने दिली जाते. शिवाय जूनपासून प्रतिमहिना साखरेत 1 किलोने वाढ देण्याचाही निर्णय घेतलेला आहे.
सभासद शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘सहकार’ आघाडीचा जाहीरनामा :
- येत्या 2 वर्षात विस्तारीकरण आणि को-जेन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन सभासदांना जास्त दर देणार.
- कारखाना कार्यस्थळावर सभासद शेतकऱ्यांसाठी स्वस्त औषधी दुकानाची सेवा उपलब्ध करणार.
- कारखान्याच्या वतीने सभासदांच्या सोयीसाठी कृषी सेवा केंद्र स्थापन करणार.
- एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या वतीने कृषी तज्ञांच्या माध्यमातून सभासदांसाठी कार्यशाळांचे आयोजन करणार.
- कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी सवलतीच्या दरात कृषी अवजारे उपलब्ध करणार.
- कारखान्याच्या वतीने दरवर्षी सभासदांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे प्रशिक्षण देणार.
- कोजेनरेशन प्रकल्प आणि उपपदार्थ निर्मिती प्रकल्पातून होतकरू तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करणार; त्यामध्ये सभासदांच्या मुलांना प्राधान्य देणार.