सहकार निबंधक विशांत गावणेकर यांनी केले अपात्र : पशुखाद्यात सहा कोटींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीची नियुक्ती

पणजी: कुर्टी-फेंडा येथील गोवा दूध उत्पादक संघाच्या (गोवा डेअरी) एकूण सात संचालकांना (6 विद्यमान व 1 माजी संचालक) सहकार निबंधकांनी अपात्र ठरविले असून तसा आदेश जारी केला आहे. उर्वरित चार पात्र संचालक डेअरीचा कारभार पाहू शकत नसल्याने आणि त्यासाठी किमान सात संचालकांची गरज असल्याने कारभार पाहण्यासाठी त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती नेमण्यात आली आहे. अपात्र ठरविण्यासाठी आदेशात कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. तथापि डेअरीतील सुमारे सहा कोटी ऊपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातून अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गोवा डेअरीवर एकूण 15 संचालकांचे मंडळ आहे. त्यातील 3 जण हे नियुक्त करण्यात येतात, तर 12 जण निवडणुकीने निवडून येतात.
अपात्र संचालक
- उल्हास सिनारी
- राजेश फळदेसाई
- विठोबा देसाई
- बाबुराव देसाई
- गुरुदास परब
- विजयकांत गावकर
- माधव सहकारी
राजीनामा दिलेले सहकारीही अपात्र
माधव सहकारी व अनुप देसाई या दोन संचालकांनी यापूर्वीच राजीनामे दिल्यामुळे संचालकांची संख्या 10 वर आली होती. राजीनामा दिलेले माधव सहकारी यांनाही अपात्र ठरविण्यात आल्याचा उल्लेख आदेशात आहे.
पशुखाद्यात सहा कोटींचा गैरव्यवहार
डेअरीमधील पशुखाद्य घोटळ्यात सहा कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप 2021 पासून होत होता. त्याची चौकशी सहकार निबंधकांसमोर सुरू होती. सहकार निबंधक विशांत गावणेकर यांनी हा आदेश जारी केला आहे. नवीन संचालक मंडळ स्थापन होईपर्यंत प्रशासकीय समिती डेअरीचा कारभार पाहणार आहे.
त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती
- पराग नगर्सेकर – अध्यक्ष
- रामा परब – सदस्य
- संदीप परब – सदस्य
राहिलेत केवळ चार पात्र संचालक
राजेश फळदेसाई हे गोवा डेअरीचे म्हणजेच संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. ते अपात्र झाल्यामुळे त्यांचे अध्यक्षपदही गेले. परिणामी डेअरीवर सध्या कोणीही अध्यक्ष नाही. सध्या मंडळावर नितीन प्रभुगावकर, उदय प्रभू, बाबू फाळू व श्रीकांत नाईक हेच पात्र संचालक म्हणून शिल्लक राहिले आहेत. डेअरीतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर सहकार निबंधकांनी सर्व 12 संचालकांना नोटिसा काढल्या होत्या. त्यांना उत्तरेही देण्यात आली होती. तथापि 12 मधील 7 संचालकांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
उच्च न्यायालयात दाद मागणार : राजेश फळदेसाई
गोवा डेअरीचे अध्यक्ष असलेले परंतु आता संचालक म्हणून अपात्र ठरलेले राजेश फळदेसाई यांनी हा निकाल अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. याला उच्च न्यायालयात आव्हान देऊन न्याय मागणार असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी डेअरीचा ताबा प्रशासकांकडे होता. तेव्हाच निवडणुकीच्या मार्गाने संचालक मंडळ नेमण्यात आले. अपात्र करण्यामागे कोणाचा तरी हात आहे. संजीवनी साखर कारखान्याची जी गत झाली तशीच गत या दूध डेअरीची होणार की काय? अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली.









