गावगुंडाकडून दहशतीची घटना; फोंडा पोलीस निवांत : विद्यार्थ्यानी अनुभवला भितीदायक थरार
फोंडा : कुर्टी-फोंडा येथील केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या स्कूल बस चालकाला सावित्री हॉलजवळील सव्हीर्स रोडजवळ दोघां अज्ञांतानी बेदम मारहाण केल्याचा भितीदायक थरार काल विद्यार्थ्यांनी अनुभवला. सदर घटना काल शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गंभीर जखमी झालेला चालक एकनाथ काकोडकर (52, कोपरवाडा कुर्टी) हा फोंडा उपजिल्हा ईस्पितळात उपचार घेत आहे. दिवसाढवळ्या गुंडागिरीला प्रोत्साहत देणारे फोंडा पोलीस मात्र हातावर हात ठेवून काहीच न घडल्यासारखे निवांत आहेत. प्राप्त माहितीनुसार केंद्रीय विद्यालयातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना घरी पोचविण्यासाठी जीए 03 एक्स 0519 कदंब बस घेऊन चालक काकोडकर दुपारी 2 वा. विद्यालयाकडून बोरीपर्यंत जाण्यासाठी निघाला होता. कुर्टी सावित्री हॉलजवळील सर्व्हीस रोडवर रस्त्यावर अडथळा निर्माण करीत युवक दुचाकीवर बसले होते. त्याना बाजूला व्हा असा ईशारा चालकाने दिला होता. विद्यार्थ्यांना घरी पोचविण्याच्या घाईत तशीच वाट काढत कदंब चालक पुढे गेला. कदंबा बस घटनास्थळावरून काही अंतरावर अंडरपासजवळ पोचेपर्यत रागाच्या भरात असलेल्या युवकानी दुचाकी बससमारे आडवी घातली. यावेळी या दोघा गुडांनी स्कुल बस असल्याची तमा न बाळगता गाडीत घूसून कदंब बसचालकांना विद्यार्थ्यासमोर बेदम मारहाण केली.
चिरमुंड्या विद्यार्थ्यासमोर बसमध्ये घडला थरार, पोलीसांचे मौन
विद्यार्थ्यानी जिवाच्या आकांत करीत मोठ-मोठयाने आरडाओरडा केला. बाजूला असलेल्या दुकानदार मदतीला धावल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या भितीदायक प्रकाराला घाबरून एक विद्यार्थ्यानी बसमधून घरी पळ काढल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. काही पालकांनी सदरप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात फोन लावून सदर घटनेची माहिती विचारल्यानंतर येथील अधिकाऱ्याने असा प्रकार घडलाच नसून केवळ मारामारीची घटना घडल्याचे सुनावण्यात आल्याचा पालकांनी अनुभवले. आपली मुले सुखरूप आहे की काही याची विचारपूस करण्यासाठी तारंबाळ उडालेल्या पालकांनाही फोंडा पोलिस सहकार्य करीत नसल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे.
फोंडा पोलीसांचे प्रकरण दडपण्याचा प्रकार
पोलिसांना पाचारण केल्यानंतर रोबोट वाहन घटनास्थळावर पोचले. जखमी अवस्थेतही चालकाने प्रथम विद्यार्थ्याना घरी पोचविण्याचे कर्तव्य पार पडले. त्याने वाहन नवीन कदंब बसस्थानक येथे पार्क केल्यानंतर फोंडा पोलिस स्थानकात हजेरी लावली. त्यानंतर उपचारासाठी फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल झाला. फोंडयात सद्या दिवसाढवळ्या गुंडागिरीच्या घटना घडू लागल्याने पोलिसाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सायंकाळपर्यत अज्ञात संशयित पोलिसांच्या हाती लागले नव्हते. या घटनेमुळे पालकांनी भिती व्यक्त केली आहे.









