वृत्तसंस्था/ शारजाह
भारताचा स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, सायना नेहवाल यांचे ट्विटरवर करोडो फॉलोअर्स आहेत. असे असूनही, ट्विटरच्या नव्या धोरणानुसार, या खेळाडूंच्या अकाऊंटवरून व्हेरिफाईड ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे. या ब्ल्यू टिकमुळे स्टार खेळाडू व सेलिब्रेटी लोकांचे हे अधिकृत अकाऊंट आहे, याची ओळख होत असे. आता मात्र ही ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे.
ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी यापूर्वीच याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की, 20 एप्रिलनंतर ज्या लोकांनी सशुल्क सबक्रिप्शन घेतले नाही अशा लोकांच्या अकाऊंटमधून व्हेरिफाईड ब्लू टिक काढून टाकले जाईल. आता तुम्हाला ट्विटरवर ब्लू टिक हवी असेल, तर त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला ठराविक किंमत मोजावी लागेल. गुरुवारी मध्यरात्रीपासून नवीन धोरण लागू करण्यात आले. मध्यरात्रीपासून स्टार क्रिकेटर्स, राजकारणी आणि अनेक बॉलीवूड स्टार्सच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवण्यात आले आहे. दरम्यान विराट कोहलीचे ट्विटरवर 55.1 मिलियन (5 कोटींहून अधिक) रोहित शर्माचे 21.7 मिलियन आणि धोनीचे 8.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर सचिन तेंडुलकरचे 38.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. असे असूनही, गुरुवारी मध्यरात्रीपासून भारतीय क्रिकेटमधील या दिग्गजांच्या अकाऊंटमधून ब्लू टिक्स काढण्यात आली आहे.
ब्लू टिकसाठी द्यावे लागतील पैसे!
ट्विटर ब्लू सबक्रिप्शनची सुविधा काही काळापूर्वी भारतात सुरू करण्यात आली आहे. जर तुम्हाला ही सुविधा भारतात मोबाईलवर घ्यायची असेल तर 900 रुपये आणि वेब व्हर्जनसाठी 650 रुपये मासिक सबक्रिप्शन निश्चित करण्यात आली आहे. त्याचवेळी वापरकर्ते प्रीमियर सेवेची सदस्यता देखील घेऊ शकतात. यासाठी वर्षाला 6800 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे दरमहा 565 रुपये.









