5 मतदारसंघातील अर्जांविषयी आक्षेप
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातून 3,632 उमेदवारांनी 5,102 अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी अर्जांची छाननी झाली. मात्र, सौंदत्ती-यल्लम्मा, औराद, हावेरी, रायचूर आणि शिवाजीनगर वगळता सर्व मतदारसंघांमधील अर्ज वैध अर्जांचा तपशिल निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार एकूण 3,044 उमेदवारांचे 4,989 अर्ज वैध ठरले आहेत.
3,327 पुरुष उमेदवारांनी 4,710 तर 304 महिला उमेदवारांनी 391 अर्ज दाखल केले आहेत. एका तृतीयपंथी उमेदवारानेही अर्ज भरला आहे. शुक्रवारी अर्ज छाननीनंतर पुरुषांचे 4,607 उमेदवारी अर्ज तर महिलांचे 381 अर्ज वैध ठरले आहेत. तृतीयपंथी उमेदवाराचा अर्जही वैध ठरला आहे.
सत्तधारी भाजपच्या उमेदवारांचे 219, काँग्रेसचे 218, निजदचे 207, बसपचे 135, सीपीआयएमचे 4, आम आदमी पक्षाचे 207 आणि इतर पक्षातील 720 उमेदवारी अर्ज वैध ठरले. अपक्ष उमेदवारांचे 1334 अर्जही वैध ठरले आहेत. मात्र, संयुक्त जनता दलाचे नेलमंगलमधील उमेदवार रामय्या यांचा अर्ज अवैध ठरला आला. उमेदवारी अर्जावर सूचकांची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे.
सौंदत्ती-यल्लाम्मा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रत्ना मामनी यांच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेला काँग्रेस आणि निजद उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या अर्जाच्या वैधतेविषयी निवडणूक अधिकाऱ्यांनी अद्याप निर्णय घेतला नसल्याचे समजते.









