गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाम आणि नागालँड यांच्यातील विवादित सीमारेषेवर कच्च्या इंधन तेलाचे साठे असल्याचा शोध लागला आहे. त्यामुळे ही दोन्ही राज्ये विवादित सीमाक्षेत्रात एकत्रितरित्या तेलाचा शोध घेण्यात राजी झाली आहेत. या सीमेच्या भागात तेलाचे साठे सापडल्यास त्याचा या दोन्ही राज्यांना, तसेच देशालाही लाभ होणार आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी एका बैठकीत हा निर्णय घेतला. विवादित सीमाक्षेत्रात तेलाचा शोध घेण्याचे काम दोन्ही राज्ये करणार आहेत. यासाठी दोन्ही राज्यांची एक संयुक्त तज्ञसमिती स्थापन करण्यात येणार आहे. अनेक दशके दोन्ही राज्यांमध्ये सीमाविवाद सुरु आहे. मात्र, दोन्ही राज्ये तो मिटविण्यासाठी तयार झाली आहे. सामोपचाराच्या माध्यमातून या विवादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न दोन्ही राज्यांकडून होत असून त्यात लवकरच यश येईल, असे वक्तव्य आसाम सरकारने प्रसिद्ध केले आहे.
तेलाच्या माध्यमातून तोडगा
विवादित सीमाभागात तेलाचे साठे असण्याची शक्यता भूगर्भ विभागाने व्यक्त केली होती. तसा अहवालही पाठविण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही राज्ये आता सीमाविवाद विसरुन व्यापक आर्थिक लाभासाठी संयुक्तरित्या तेलशोध घेणार आहेत. साठे सापडल्यास सीमाविवाद संपुष्टात येण्यास साहाय्य होणार आहे. दोन्ही राज्ये या कामी लवकरच संयुक्तरित्या प्रयत्न सुरु करणार आहेत.









