हिंदू पंचांगानुसार पाडव्याला आमचं नवीन वर्ष जरी सुरू होत असलं तरी या वेळचा ऋतू मात्र थोडासा तापदायक आहे. चैत्राच्या पालवीचे कोंबदेखील डोकवायला लागलेले असतात. प्रत्येक ऋतूचं आपलं वेगळेपण असतं. त्याची प्रवासाची दिशासुद्धा ठरलेली असते. जगण्याच्या क्षणांना न मोजताच ते स्मृतीत रहावे यासाठी प्रत्येक ऋतूची धडपड चालू असते. चैत्र महिनासुद्धा असंच काहीसं वेगळेपण घेऊन येतो. त्याच्यातला गंध आणि फुलं हे खरंतर चैत्र पालवीची चाहूल देणारे असतात. पर्णहीन फांद्या आकाशाचे निळे पदर हातावर तोलत उभे असतात. आंबा, कडुलिंब आणि वड मात्र भरपूर पानांबरोबर मोहर आणि पारंब्या झुलवत असतात. आंब्याचे झाड तर जणू काही आमरसाचे आमंत्रणच देत असतं. तर कडुलिंबाचे मोहर पाडवा साजरा करून कुठे गायब होतात कुणास ठाऊक? अशावेळी सोनमोहर, नीलमोहर आणि गुलमोहर भरभरून फुलून आलेले असतात. चाफा मात्र कोणासाठी तरी फुलांचे बुके बांधून आदबीन उभा असतो. समोरून येणाऱ्या प्रत्येकाला वाटतं, की हे सगळे गुच्छ माझ्या स्वागतासाठीच आहेत. चाफा खरं तर विरक्तीच्या अंतिम टप्प्यावर असतो, पण जाता जाता तुमचे आमचे क्षण बहराचे करतो. भरभरून जगता जगताच आनंदाने गिरक्या घेत मातीशी एकरूप होता आलं पाहिजे हे तो शिकवून जातो. चाफ्यासारखंच मंद सुगंधाने लक्ष वेधणारे मधुमालतीचे वेल, ते देखील असेच, तुम्ही कुठूनही जात असा क्षणभर थांबून हा सुगंध शोधायचा आपण प्रयत्न करतोच. इतक्यात जोराचा वारा येतो आणि एखादी मधुमालतीची फुलांनी लगडलेली फांदी आपल्या गालाला हळुवार स्पर्श करून पुन्हा झुलत राहते. त्या फांदीबरोबर आपणही केव्हा लहान मूल होतो कळत नाही. आपणही अलगद त्या फुलांवरून हात फिरवायचा प्रयत्न करतो. आणि अशातच मनाचे झोके झुलायला लागतात. आपण मात्र चैत्रगौरीच्या वैभवात तिथे बसलोय असं सारखं वाटायला लागतं.
या महिन्याचा सुगंधाचे साम्राज्य असलेला सम्राट म्हणजे मोगरा. तो पण खरंतर पानात लपून बसतो पण संध्याकाळी बहरतांना सुगंधाच्या कुप्या हलकेच उघडतो. शहरातल्या माणसांना कुंडीत एखादं फुल जरी मोगऱ्याचं आलं तरी त्याचं केवढं अप्रुप वाटतं. पण मोगरा फुललाय ही गंधवार्ता आम्हा सगळ्यांना अगदी पहिल्यांदा सिग्नल वर उभा असलेल्या गजरेवाल्यांकडून मिळते. गर्दीमध्ये वैतागलेलो आम्ही उन्हामुळे घामेजलेलो हिरवा सिग्नल केव्हा लागतोय याची वाट पहात एका पायावर तपश्चर्येला उभे असल्यासारखे उभे असतो, आणि एवढ्यात वाऱ्याची झुळूक मोगऱ्याचा सुगंध घेऊन येते. अतिशय सुखद असा तो सुगंध आम्हाला क्षणार्धात प्रसन्न करतो. सगळी मरगळ घालवून टाकतो. चैत्रपालवीची पाऊलवाट आमच्या समोर आलेली असते. त्या हिरव्या सिग्नलचं सहजच एक सुंदर हिरवं झाड होतं आणि या मोगऱ्याच्या सुगंधात न्हाहून आम्ही पुढे निघतो. मोगऱ्याबरोबरच वेळी अवेळी येणारा वळीव या चैत्रांगणासाठी अंगण शिंपून जातो. तो असा काही धुरळा उडवतो की गाडी कडेला घेऊन उभे राहावेच लागते. पंधरा-वीस मिनिटं ह्या सगळ्या गदारोळानंतर त्या धुळीच्या मागनं येणाऱ्या वळवाच्या सरी थांबल्यानंतर आम्ही डोळे चोळत चोळत समोर बघायला जातो तर एकदमच काहीतरी चमत्कार घडावा किंवा साक्षात्कार व्हावा तसा एक लख्ख पिवळ्या फुलांचे घोस घेऊन किंवा झुंबरं घेऊन बहावा उभा असतो. आपली अवस्था ‘आजी ह्या ब्रह्म पाहिले’ अशी होते. बहाव्याची फुलं नुकतीच आंघोळ करून आलेल्या, सुचिर्भूत झालेल्या, एखाद्या ललनेसारखे उभी असतात. त्याच्या पाकळ्यांचा मऊपणा लांबून सुद्धा स्पर्श न करताच मनाला गुदगुल्या करत असतो. सगळ्या वातावरणात तो पिवळा जर्द रंग भरतो. लोभस रचनेचा हा बहाव्याचा बहर चैत्रासाठी झुंबराचे तोरण गुंफतो. आपण मात्र मोगऱ्याचे अत्तर लावून हातात चाफ्याचे बुके तोलत चालणारा कोणीतरी सम्राट आहोत अशा थाटात चालायला लागतो, आणि चैत्र पालवी झाडांपेक्षा मनात जास्त रुजते याचा अनुभव येतो.








