आज फॉक्स न्यूजबद्दल जगभरातील प्रसार माध्यमात चर्चा सुरू आहे. कारण, अमेरिकेतील डेलावेयर उच्च न्यायालयाने फॉक्स न्यूजला एका बदनामी खटल्यात जबाबदार धरून तब्बल 58,059 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. अमेरिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एका प्रसारमाध्यम उद्योगास भरावी लागणारी ही सर्वोच्च नुकसान भरपाई ठरली आहे.
1997 साली ‘टुमारो नेव्हर डाईज’ नावाचा एक जेम्स बाँडपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात इलिएट कार्व्हर नामक एक खलनायक दर्शविला होता. या कार्व्हरकडे जगातील सारी मोठी, सर्वदूर पसरलेली प्रसारमाध्यमे एकवटलेली असतात. त्यांच्या मालकीमुळे प्रसार माध्यमांचा अनभिषिक्त सम्राट अशी त्याची ख्याती असते. यापुढे त्याची महत्त्वाकांक्षा, जगातील सर्वात शक्तिमान माणूस, ज्याच्यापुढे, राज्यकर्ते, राज्यसत्ता झुकतील असा बनण्याची असते. या महत्त्वाकाक्षेपोटी तो चीन आणि संयुक्त संघराज्य (ग्रेट ब्रिटन) या दोन मोठ्या देशात युद्ध घडवून आणण्याचे ठरवतो. या युद्धाचे चित्रिकरण, वार्तांकन करून पैसे मिळवायचे. शिवाय चीनसारख्या महासत्तेकडून चीनमध्ये आपली प्रसारमाध्यमे सुरू करण्यासाठी परवानगी मिळवायची अशी कार्व्हरची योजना असते. एकंदरीत आधुनिक काळात बऱ्याच मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांवर अधिसत्ता असणारी व्यक्ती विपरित विचार करू लागली तर कोणता हाहा:कार घडवू शकते हे दर्शविणारा हा चित्रपट होता. त्याचप्रमाणे आधुनिक जगात, माणसाकडे अप्रत्यक्ष सत्ता आणि प्रचंड शक्ती ही केवळ शस्त्रास्त्रे आणि सैन्यामुळेच येते असे नाही तर माहिती आणि तंत्रज्ञानावर, प्रसार माध्यमांवर त्याचे व्यापक नियंत्रण असेल तरीही येऊ शकते, असा या चित्रपटाचा संदेश होता.
जगातील एक प्रसिद्ध उद्योगपती आणि प्रसार व संचार माध्यमांचा सम्राट म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या रुपर्ट मरडॉक यांच्यावर ‘टुमारो नेव्हर डाईज’ मधील खलनायक ‘कार्व्हर’ हे काल्पनिक पात्र बेतले होते. अशा बातम्या सदर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रसारित झाल्या होत्या. फॉक्स न्यूज, वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क पोस्ट ही अमेरिकन, द सन, द टाईम्स ही ब्रिटीश, द डेली, टेलिग्राफ, हेराल्ड सन, द ऑस्ट्रेलियन ही
ऑस्ट्रेलियन या शिवाय ट्वेंटी फस्ट सेंच्युरी
फॉक्स, न्यूज ऑफ द वर्ल्ड या सारख्या शेकडो मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक शिवाय आताच्या डिजिटल माध्यमांवर रुपर्ट मरडॉक यांचे आधिपत्य होते आणि आहे. आपल्या हाती असलेल्या या प्रसार व संचार शक्तीचा गैरवापर केल्याचे अनेक आरोपही त्यांच्यावर गत काळात झाले आहेत. मोबाईल फोन हॅकिंग, मेल बॉक्समधील माहितींची चोरी, राजकीय व्यक्ती, बड्या प्रशासकीय व्यक्ती तसेच वलयांकित व्यक्तिमत्त्वे यांची अत्यंत खासगी माहिती अवैध मार्गाने चोरी असे अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत आणि गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. तरीही अशा संकटातून मार्ग काढत रुपर्ट मरडॉक आणि त्यांचे वारसदार यांची वाटचाल सुरू आहे. आजही माध्यमांवरील त्यांचे प्रभुत्व जाणवण्याइतपत आहे.
रुपर्ट मरडॉक यांनी 1986 च्या सुमारास अमेरिकेत फॉक्स इनकॉर्पोरेशन ही कंपनी स्थापीत केली. एबीसी, सीबीएस आणि एनबीसी या अस्तित्वात असलेल्या दूरदर्शन प्रसारण कंपन्यांशी स्पर्धा करीत फॉक्स इनकॉर्पोरेशन या नव्या दूरदर्शन प्रसारण कंपनीने आपले जाळे अमेरिकेत सर्वत्र पसरवले आणि स्वत:चे महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले. ‘फॉक्स न्यूज’ हा याच कंपनीचा एक वाहिनी म्हणून अस्तित्वात आलेला आविष्कारही अमेरिकेत लोकप्रिय झाला. आज याच
फॉक्स न्यूजबद्दल जगभरातील प्रसार माध्यमात चर्चा सुरू आहे. कारण, अमेरिकेतील डेलावेयर उच्च न्यायालयाने फॉक्स न्यूजला एका बदनामी खटल्यात जबाबदार धरून तब्बल 58,059 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. अमेरिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एका प्रसारमाध्यम उद्योगास भरावी लागणारी ही सर्वोच्च नुकसान भरपाई ठरली आहे.
अमेरिकेत 2020 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत्या. या निवडणुकीत ट्रम्प यांनी पराभवानंतर निवडणुकीत अफरातफर, भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते. याच निवडणुकीत
फॉक्स न्यूज वाहिनीने आपल्या प्रसारणात सातत्याने मतदान यंत्र बनवणाऱ्या डोमिनियन कंपनीवर सदर मतदान यंत्रे सदोष असल्याचे आरोप केले होते. त्यामुळे एकूण निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन अमेरिकेत बरीच खळबळ माजली होती. या प्रकरणी मतदान यंत्रे तयार करणाऱ्या डोमिनियन कंपनीची विश्वासार्हता संकटात सापडून कंपनीच्या आर्थिक व्यवहारावर त्याचा परिणाम झाला होता. कंपनीच्या मुख्य प्रवर्तकासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणारा मनस्ताप व मानहानी ही दुसरी बाजूही या घटनेस होती. अखेर या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आपल्या उत्पादनाच्या दर्जा आणि अचुकतेबद्दल विश्वास असलेल्या डोमिनियन कंपनीने फॉक्स न्यूजला मानहानीचा दावा करीत न्यायालयात खेचले.
आरंभी कॅनडामध्ये अगदी छोट्या प्रमाणात प्रायोगिक तत्त्वावर मतदान यंत्रांची निर्मिती करणाऱ्या डोमिनियन कंपनीचे सर्वेसर्वा जॉन पवालो हे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. पाहता पाहता त्यांनी कंपनीचा विकास केला आणि अमेरिकेत बस्तान बसवले. डेमॉक्रसी सुट सॉफ्टवेअर, इमेज कास्ट व्होटींग आणि टॅब्युलेशन मशीन्स इत्यादी यंत्रणा पुरवणारी अमेरिकेतील आघाडीची कंपनी असा लौकिक तिने मिळवला. परिणामी 2020 च्या निवडणुकीत अमेरिकेतील 28 राज्ये ज्यांत अनेक अटीतटीची लढत असलेल्या राज्यांचा समावेश आहे आणि काही संवेदनशील राज्यातही आपली मतदान यंत्रे व यंत्रणा वापरण्याची जबाबदारी डोमिनियनवर सोपवण्यात आली होती. ती यशस्वीपणे पार पाडली असे कंपनी प्रशासनास वाटत असतानाच कंपनीविरुद्ध बदनामीची वावटळ उठली. दोन वर्षांपूर्वी डोमिनियन कंपनीने खरे तर 1.6 अब्ज डॉलर्सचा दावा फॉक्स न्यूजवर केला होता. परंतु अखेर गेल्या मंगळवारी अंतिम निकाल लागताना तडजोड होऊन अठ्ठावन्न हजार कोटींवर नुकसान भरपाईचा आकडा स्थिर करण्यात आला. अर्थात फॉक्स न्यूजची सुटका इतक्यानेच होईल अशीही चिन्हे नाहीत. कारण स्मार्ट मैटिक नावाच्या आणखी एका मतदान यंत्रे बनवणाऱ्या कंपनीने
फॉक्स वाहिनीवर 2.7 अब्ज डॉलर्सचा दावा आपल्या बदनामीबद्दल ठोकला आहे.
हे सारे प्रकरण पहात बातम्या, वार्तांकन, मतप्रदर्शन करताना प्रसार माध्यमांनी सत्य आणि नीती या तत्त्वांची कास धरूनच ते केले पाहिजे हा धडा मिळतो. अलीकडच्या काळात अनेक प्रसार माध्यमांवर बडे उद्योजक, राजकारणी, काळ्या व्यवहारातील धनदांडगे यांचा कब्जा आहे. स्वाभाविकपणे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या या माध्यमातील वातावरण बरेच प्रदुषित झाले आहे. असत्य, पक्षपात, भ्रष्टाचार, अनैतिकता यांचे ग्रहण त्यास लागले आहे. ते पूर्णत: दूर झाल्याशिवाय माध्यमांची विश्वासार्हता जगभरात पुर्नप्रस्थापित होणार नाही.
फॉक्स न्यूज आणि त्याचे संस्थापक रुपर्ट
मरडॉक यांच्यावर बेतलेले एक पात्र खलनायक म्हणून ‘टुमारो नेव्हर डाईज’ या बाँडपटात आले होते. याचा उल्लेख लेखाच्या आरंभी आला आहे. या चित्रपटाचे नाव सुरुवातीस ‘टुमारो नेव्हर लाईज’ अर्थात ‘उद्याचा काळ कधीच असत्य सांगत नाही’ असे होते. ते किती सयुक्तिक होते हे या खटल्याच्या निमित्ताने दिसून आले.
– अनिल आजगावकर








