10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 3, 600 हून अधिक उमेदवारांनी एकूण 5, 102 उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहीती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्याने 13 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. एकूण नामांकनांपैकी 3, 327 पुरुष उमेदवारांनी 4,710 अर्ज भरले आहेत तर 304 महिला उमेदवारांनी 391 अर्ज दाखल केले आहेत. तर एका तृथियपंथिय उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे.
एकूण दाखल झालेल्या अर्जामध्ये 707 उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर 651 उमेदवारांनी काँग्रेस पक्षाच्या नावाखाली आपली उमेदवारी भरली आहे. 455 उमेदवार जेडी (एस) पक्षाकडून इच्छुक आहेत. इतर लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडूही उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एका उमेदवाराला एकूण चार अर्जापर्यंत अर्ज दाखल करता येऊ शकतात. शेवटच्या दिवशी अनेक दिग्गज नेत्यांसह 1,691 उमेदवारांनी एकूण 1,934 उमेदवारी अर्ज दाखल केले.
नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास अगोदर बंगळूर ग्रामीणचे काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांनी कनकापुरा भागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. डीके सुरेश यांचे मोठे बंधू आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे पक्षाचे उमेदवार आहेत. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, शिवकुमार यांचा अर्ज फेटाळला गेल्यास सुरेश यांनी “बॅकअप प्लॅन” म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत.
हसनमध्ये, JD(S) उमेदवार एचपी स्वरूप यांनी माजी पंतप्रधान आणि JD(S) प्रमुख एचडी देवेगौडा यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठिंब्याने उमेदवारी दाखल केली. बुधवारी रात्री पक्षाने जाहीर केलेल्या शिवमोग्गा येथील भाजपचे उमेदवार चन्नाबसप्पा यांनीही आज अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार के.एस. ईश्वरप्पा यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला.









