कोलकाता संघाचा चार गड्यांनी पराभव : वॉर्नरचे अर्धशतक, अक्षर पटेलची अष्टपैलू खेळी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पावसाच्या अडथळ्यामुळे उशिरा सुरू झालेल्या 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील येथे गुरुवारी झालेल्या सामन्यात यजमान दिल्लीने तब्बल पाच सामन्यानंतर आपल्या विजयाचे खाते उघडले. गोलंदाजीस अनुकूल ठरलेल्या खेळपट्टीवर दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघालाही या स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत झगडावे लागले. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय आणि नितीश राणा या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत सामन्याला रंगत आणली. कर्णधार वॉर्नरने 41 चेंडूत 11 चौकारांसह 57 धावा झळकाविताना शॉ समवेत पहिल्या गड्यासाठी 27 चेंडूत 38 धावा जमविल्या. शॉने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. मिचेल मार्श 2 धावांवर तर फिल सॉल्ट 5 धावांवर तंबूत परतले. डेविड वॉर्नर चौथ्या गड्याच्या रुपात बाद झाला. वरुण चक्रवर्तीने वार्नरला पायचीत केले. तत्पूर्वी त्याने शॉचा त्रिफळा उडविला होता. मनिष पांडेने 23 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. अनुकूल रॉयने पांडेला झेलबाद केले. त्यानंतर राणाने अमन खानचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. 16.2 षटकात दिल्लीची स्थिती 6 बाद 111 अशी होती. अक्षर पटेल आणि ललित यादव या जोडीला कोलकाताच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. अक्षर पटेलने 22 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 19 तर ललित यादवने नाबाद 4 धावा जमविल्या. दिल्लीच्या डावात 17 चौकार नोंदविले गेले. कोलकाता संघातर्फे वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय आणि नितीश राणा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दिल्ली कॅपिटल्सने या पहिल्या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात 2 गुणासह आपले खाते उघडले.
यजमान दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सला 127 धावावर रोखले. कोलकाता संघातर्फे जेसन रॉय, मनदीप सिंग आणि आंद्रे रसेल यांनी दुहेरी धावसंख्या गाठली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 19.2 षटकात 6 बाद 128 धावा जमविल्या. तत्पूर्वी या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून कोलकाता संघाला प्रथम फलंदाजी दिली. दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान तसेच फिरकी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याने कोलकाता संघाच्या फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. रॉय व आंद्रे रसेलच्या समयोचित नाबाद 38 धावामुळे कोलकाता संघाला तीन अंकी धावसंख्या पार करता आली. कोलकाता संघातील सलामीच्या जेसन रॉयने 39 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 43, मनदीप सिंगने 11 चेंडूत 1 षटकारासह 12 तर आंद्रे रसेलने 31 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 38 धावा जमवल्या. दासने 4, नितीश राणाने 4, रिंकू सिंगने 6, सुनील नरेनने 4, उमेश यादव 3, तर चक्रवर्तीने 1 धाव जमवली. कोलकाता संघाला अवांतराच्या रुपात 11 वाईड चेंडूसह 12 धावा मिळाल्या. 15.4 षटकात कोलकाता संघाची स्थिती 9 बाद 96 अशी होती. पण त्यानंतर आंद्रे रसेल आणि चक्रवर्ती या शेवटच्या जोडीने 26 चेंडूत 31 धावांची भर घातली आहे. त्यामध्ये चक्रवर्तीचा वाटा केवळ एक धावेचा होता. कोलकाता संघाच्या डावामध्ये 6 षटकार आणि 10 चौकार नोंदवले गेले. दिल्लीतर्फे इशांत शर्मा, नॉर्त्जे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर मुकेशकुमारने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकात सर्वबाद 127 (जेसन रॉय 43, लिटन दास 4, वेंकटेश अय्यर 0, नितीश राणा 4, मनदीप सिंग 12, रिंकू सिंग 6, सुनील नरेल 4, आंद्रे रसेल नाबाद 38, रॉय 0, उमेश यादव 3, चक्रवती 1, अवांतर 12, इशांत शर्मा 2-19, नॉर्त्जे 2-20, अक्षर पटेल 2-13, कुलदीप यादव 2-15, मुकेशकुमार 1-34).
दिल्ली कॅपिटल्स : 19.2 षटकात 6 बाद 128 (वॉर्नर 57, शॉ 13, मार्श 2, सॉल्ट 5, मनिष पांडे 21, अक्षर पटेल नाबाद 19, ललित यादव नाबाद 4, अवांतर 7, वरुण चक्रवर्ती 2-16, अनुकूल रॉय 2-19, नितीश राणा 2-17).









