नर्सरी बागेतील समाधीस्थळी आयोजन; शाहूप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीचा समारोप 6 मे रोजी होणार आहे. समारोपाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी सोमवारी (दि. 24 एप्रिल) नर्सरी बागेतील शाहू समाधीस्थळ येथे सायंकाळी पाच वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीच्या वतीने आयोजित या बैठकीत शाहूप्रेमींकडून केल्या जाणाऱ्या सूचनांचा विचार करून नियोजन केले जाणार आहे. ही माहिती समितीच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.
शाहू स्मृती शताब्दीच्या निमित्ताने गेली वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाहूंची विविध स्मारके या निमित्ताने आठवणींच्या रूपाने पुढे आणली गेली. आता येत्या 6 मे रोजी स्मृती शताब्दीची सांगता होणार आहे. त्यानिमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी समितीच्या वतीने सोमवारची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत शाहूप्रेमींकडून केल्या जाणाऱ्या विविध सूचना, आवाहनांचा विचार करून नियोजन पेले जाणार आहे. बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, बबनराव रानगे आनंद म्हाळुंगेकर बाळासो भोसले, कादर मलबारी संजय कांबळे, उमेश पोर्लेकर, विजय पाटील, डी. जी. भास्कर, शाहीर दिलीप सावंत, सोमनाथ घोडेराव, सुखदेव बुध्याळकर महेश मछले, अमित आडसुळे यांनी केले आहे.









