राहुल यांचे निकटवर्तीय श्रीनिवास अडचणीत
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम युवा काँग्रेसच्या प्रमुख अंगकिता दत्ता यांनी युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास आणि सचिव प्रभारी वर्धन यादव यांच्यावर शोषणाचा आरोप केला आहे. महिलांचा आदर कसा करावा हे वर्धन यादव यांना माहित नाही. वर्धन हे मला ‘ए लडकी’ अशाप्रकारे हाक मारतात. श्रीनिवास आणि वर्धन यांनी रायपूर येथील अधिवेशनादरम्यान ‘ए लडकी क्या पीता है तुम, व्होडका पीता है’ अशी विचारणा केली होती. त्यांच्या विरोधात तक्रारी करूनही पक्षनेतृत्वाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचे अंगकिता दत्ता यांनी म्हटले आहे.
या दोन्ही नेत्यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या अन् माझ्या छायाचित्राचा वापर करत एक पोस्टर तयार केले. त्यानंतर त्यांच्याकडून माझ्यावर नाहक आरोप करण्यात आले. एखादी महिला स्वतःच्या अपमानाविरोधात आवाज उठवत असेल तर पक्षाने दुर्लक्ष करू नये. माझे आजोबा अन् वडिल आसाममध्ये काँग्रेस अध्यक्ष राहिल आहेत. काँग्रेस पक्ष सोडण्याची आमची इच्छा नाही. परंतु संबंधित नेत्यांची इच्छा असल्यास त्यांना आमची हकालपट्टी करावी. काँग्रेसवर आम्ही मनापासून प्रेम करतो असे अंगकिता यांनी म्हटले आहे.
श्रीनिवास आणि वर्धन यादव यासारख्या लोकांनीच पक्षाचे नुकसान केले आहे. आसाममधील राजकारणाला गलिच्छ स्वरुप देण्याचे काम या दोन्ही नेत्यांनी केले आहे. या दोघांविरोधात मी एकटीच लढत आहे. आई अन् तीन बहिणींच्या मदतीने मी लढा देत असल्याचे अंगकिता दत्ता म्हणाल्या.
डॉक्टर दत्ता यांच्या आरोपांवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये महिलांबद्दल सहानुभूतीचा अभाव दिसून येत आहे. युवा काँग्रेस नेत्याला छळाप्रकरणी सोशल मीडियाची मदत घ्यावी लागत आहे. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा डोळे मिटून असल्याची टीका भाजप नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य खुशबू सुंदर यांनी केली आहे.
तर काँग्रेसने अंगकिता दत्ता यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. अंगकिता या आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या संपर्कात असून भाजपमध्ये सामील होण्याच्या उद्देशाने त्या वातावरणनिर्मिती करत असल्याचे काँगेसकडून म्हटले गेले आहे.









