पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून आधी त्याला मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याची हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला टांगण्यात आल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील नित्रुड या गावात घडली आहे. गुलाम मोहम्मद मुर्तूजा शेख असं या शाळकरी मुलाचं नाव असून या प्रकरणा कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहीतीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड या गावातील नववीत शिकत असलेला १५ वर्षांचा गुलाम मोहम्मद मुर्तूजा शेख हा शाळकरी विद्यार्थी मंगळवारी सकाळी आपली बहीण सिमरन आणि छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन सरपण आणायला गेला होता. आपल्या आजोबांच्या शेतात ठेवलेले सरपण आणण्यासाठी आरोपी डाके य़ांच्या शेतातून गेला. त्याचवेळी तिथे असलेल्या कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलामला रस्त्यात अडवून आमच्या शेतातून का गेलास? असं विचारणा केली आणि मारहाण केली. तसेच त्याला जमिनीवर आडवं पाडून तुडवले. हा प्रकार पाहताच भेदरलेल्या त्याच्या छोट्या भाऊ आणि बहिणीने हा प्रकार आपल्या आई वडिलांना सांगिण्यासाठी घरी धाव घेतली.
दरम्यान, रागाने बेभान झालेल्या आरोपींनी सरपण बांधून आणण्यासाठी आणलेल्या ओढणीने गुलाम शेखचा गळा आवळला आणि आत्महत्येचा बनाव करण्यासाठी त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडाला टांगला. गुलामचे कुटुंबिय घटनास्थळापर्यंत येईपर्यंत तो गतप्राण झाला होता. गटनास्थळी गुलामचा मृतदेह पाहून आईवडिलांनी एकच टाहो फोडला.
या गटनेने नित्रुड गावात तणावपुर्ण वातावरण झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघां पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.








