ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या कोंढवा परिसरातील पीएफआयच्या ब्यू बेल शाळेत मुस्लीम तरुणांना कट्टर बनविण्यासाठी दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येत होते. मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने या शाळेवर कारवाई करत दोन मजले सील केले होते. शिक्षण उपसंचालकांच्या चौकशीत शाळेकडे बोगस प्रमाणपत्र असल्याचे उघड झाले आहे. या शाळेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
पीएफआयच्या या शाळेत मुस्लीम तरुणांना भरती करण्यात येत होते. या तरुणांना कट्टर बनविण्यासाठी शाळेच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले जात होते. 2047 पर्यंत इस्लामिक राजवट स्थापन करण्यास विरोध करणाऱ्यांना संपविण्यासाठी शसस्त्र व निशस्त्र प्रशिक्षण या मुलांना देण्यात येत असल्याचा एनआयएचा दावा आहे.
मागील वर्षी 22 सप्टेंबरला एनआयएने या शाळेतील दोन मजल्यांची झडती घेतली होती. तसेच येथील कागदपत्रे जप्त केली होती. त्या कागदपत्रांच्या मजकुरातील अभ्यास केल्यानंतर पीएफआय मुस्लीम तरूणांना शस्त्राचे प्रशिक्षण देत असल्याचे उघड झाले त्यानंतर एनआयएने ही कारवाई केली होती. त्यांच्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांना टार्गेट करून त्यांची हत्या घडवून आणण्याचा कटही पीएफआय रचत असल्याचा दावा एनआयएने केला होता.