पोलिसांबरोबर वाहनचालकांची वादावादी : सततच्या कोंडीमुळे वाहनचालकांतून संताप : निवडणूक शक्तिप्रदर्शनामुळे समस्या

बेळगाव : स्मार्ट सिटीचे काम म्हणून रस्ते खोदाई, विविध जयंती आणि उत्सवांमुळे रस्ते बंद ठेवले जातात. आता तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते बंद करण्यात येत असल्यामुळे सामान्य जनतेची निष्कारण गैरसोय होत आहे. या कोणत्याच कामाला नागरिकांचा विरोध नाही. मात्र याची पूर्वकल्पना प्रशासनाने द्यावी, इतकीच त्यांची मागणी आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे सतत रस्ते अडविले जातात. मात्र त्याची पूर्वकल्पना नसते. एक ते तीन महिने काम चालणार असेल तर पत्रक प्रसिद्धीस दिले जाते. मात्र अधेमध्येच सतत वेगवेगळ्या कारणांनी रस्ते बंद करताना त्याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना सामान्य जनतेला दिली जात नाही. सकाळी आपल्या घरातून वेगवेगळ्या कामांसाठी लोक बाहेर पडतात. तेव्हा अचानक मार्ग बदलण्याचे त्यांना सांगण्यात येते आणि त्यांच्या वेळेचे गणित चुकते. पेट्रोलचाही खर्च वाढतो. मुख्य म्हणजे अचानक मार्ग बदल करण्यात आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते आणि उन्हाचा मारा सहन करत हळूहळू मार्गक्रमण करावे लागते.
नियोजन नसल्याने जनतेची निष्कारण फरफट
जो मार्ग प्रशासनातर्फे किंवा पोलीस दलातर्फे बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येणार आहे, त्याची पूर्वकल्पना माध्यमांना द्यायला हवी. समाज माध्यमांवरही याची माहिती मिळाल्यास लोकही त्यादृष्टिने आपले वेळापत्रक आखून बदललेल्या पर्यायी मार्गाचा विचार करतील. मात्र कोणतेच नियोजन नसल्याने अचानक मार्ग बदलला जातो आणि सामान्य जनतेची निष्कारण फरफट होते. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे कामकाज सुरू झाले आहे. यातच आता उमेदवार आपले अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे आणखी वाहतुकीची कोंडी होत असून पोलीस वाहनचालकांची अडवणूक करत आहेत. यामुळे वाहनचालक आणि पोलिसांमध्ये वादावादीच्या घटना घडत आहेत. सध्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर कोंडी होत आहे. गुरुवार दि. 20 एप्रिलपर्यंत उमेदवार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे पोलिसांवरही ताण वाढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे कामकाज गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला असला तरी दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे कामकाज सुरू आहे. ग्रामीण मतदारसंघातील उमेदवारी अर्ज रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयामध्ये दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे कित्तूर चन्नम्मा चौकापासून काकतीवेस मार्गावर उमेदवारांचे समर्थक गर्दी करत आहेत. कित्तूर चन्नम्मा चौकाकडे जाणारी वाहने अडवून जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरून माघारी व दुसऱ्या रस्त्यांवर जाण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. एक तर उन्हाचा तडाखा त्यातच वाहतुकीची कोंडी यामुळे वाहनचालक संतप्त होत आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर आणि इतर परिसरात बऱ्याचवेळा वाहतुकीची कोंडी झाली होती.









