सावंतवाडी / प्रतिनिधी
सावंतवाडी मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने फळ विक्रेते तसेच काही भाजी विक्रेते रस्ता अडवत आहेत. त्यामुळे स्थानिक तसेच पर्यटकांना दुचाकी- चार चाकी वाहने पार्किंग करणे मुश्किल होत आहे. त्यातून वाहतूक पोलीस वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. पोलिसांनी सावंतवाडी बाजारपेठेत पार्किंगचे व्यवस्था करावी अशा मागणीचे निवेदन भाजपच्या महिला शहर मंडल अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, बंटी पुरोहित आदींनी सावंतवाडी पोलिसांना दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे सावंतवाडी मुख्य बाजारपेठेत पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटक तसेच स्थानिकांना मोठा त्रास होत आहे. चारचाकी वाहने लावण्याच्या ठिकाणी भाजी विक्रेते तसेच फळ विक्रेते जागा अडवत आहेत त्यामुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण होत आहे पोलिसांनी फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा द्यावी तसेच मुख्य बाजारपेठेत पार्किंगची व्यवस्था करावी. येत्या काळात मुंबईकर चाकरमनी पर्यटक यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होणार आहे. याचा सारासार विचार करता मुख्य बाजारपेठेत दुचाकी ला पार्किंग व्यवस्था असणे गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.









