पुणे / वार्ताहर :
ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या व्यवसायिकाची कारागिरांनी 26 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात घडला. याप्रकरणी दोन आरोपींवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
संतोष रघुनाथ गायकर (रा. पिरंगुट, मुळशी, पुणे) आणि युसुफ शेख (रा. पर्वती दर्शन, पुणे) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संतोष गायकर याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत स्वप्निल सतीश कोठारी (वय 48, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा, पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 7 एप्रिल ते 13 एप्रिल यादरम्यान पर्वती येथील सेंटर बिल्डिंग याठिकाणी हा प्रकार घडला.
स्वप्निल कोठारी यांचा ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. गायकर व शेख हे दोघे त्यांच्याकडे कारागिर म्हणून कामाला आहेत. कोठारी यांनी संतोष गायकर यांच्याजवळ 243.864 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगडीचे दागिने बनवण्यासाठी दिले होते. त्यापैकी संतोषने 104.122 ग्रॅम वजनाचे दागिने तयार करून दिले. मात्र, उर्वरित 159.742 ग्रॅम वजनाचे सोने दिले नाही. तसेच आरोपी युसुफ शेख याच्याकडे 865.575 ग्रॅम वजनाचे दागिने बनवण्यासाठी दिले असता, त्यापैकी त्याने 559.320 ग्रॅम वजनाचे सोने परत दिले. उर्वरित 306.255 ग्रॅम वजनाचे दागिने परत न करता तक्रारदार यांची एकूण 26 लाख रुपयांची फसवणूक केली. दत्तवाडी पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.









