पिंपरी / प्रतिनिधी :
मुंबई-बेंगळूर महामार्गालगत किवळे येथे भलामोठा अनधिकृत होर्डिंग कोसळून पाचजण ठार झाले. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जागा मालक, होर्डिंग बनवणारा, होर्डिंग भाड्याने घेणारा आणि जाहिरात देणारी कंपनी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १७) सायंकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता घडली.
जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे, होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०४ (२), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
शोभा विजय टाक (वय ५०, रा. पारशी चाळ, देहूरोड), वर्षा विलास केदारी (वय ५०, रा. गांधीनगर, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय २९, रा. उत्तर प्रदेश), भारती नितीन मंचल (वय ३३, रा. मामुर्डी), अनिता उमेश रॉय (वय ४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विशाल शिवशंकर यादव (वय 20, रा. उत्तर प्रदेश), रहमद मोहमद अन्सारी (वय 21, रा. बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे), रिंकी दिलीप रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी होर्डिंग बसवताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेतली नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता केली नाही. वादळे आणि मुसळधार पाऊस यांचा अंदाज असताना देखील सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेता होर्डिंग लावले. मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळामध्ये होर्डिंग कोसळून त्याखाली पाचजण ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व कामगार वादळ आल्याने होर्डिंगच्या खाली असलेल्या पंक्चरच्या दुकानात आडोशाला थांबले होते. अचानक होर्डिंग कोसळल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.









