ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मी समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावडय़ा उठवल्या जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतंही तथ्य नाही. कारण नसताना माझ्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत. 40 आमदारांच्या सह्या घेण्याचे कोणतंही कारण नाही. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी पक्षातच आहोत, असे स्पष्टीकरण देत अजित पवारांनी या राजकीय चर्चांवर पडदा पाडला.
भाजपप्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्यासंदर्भात ज्या बातम्या दाखविण्यात येत आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. मी 40 आमदारांच्या सह्या घेतल्या. आज विधानभावनात आमदारांची बैठक बोलावली, अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र, या केवळ वावडय़ा आहेत. सर्व आमदार विविध कामांसाठी विधानभवनातील माझ्या कार्यालयात आले होते. माझेही काम होते. कामासाठी सर्व आमदार भेटले, त्याचा वेगळा अर्थ काढू नका. माझ्या ट्विटमधून मी काहीच हटवलेलं नाही. पण त्यातूनही गैरसमज निर्माण केले जात आहेत. उगाच ‘ध’चा मा करु नये. काही झालं तर असेल तर मीच सांगेन. तुम्हाला ज्योतिषाचीही गरज नाही. पण कोणतीही चर्चा नसताना उगाच बातम्या पेरल्या गेल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक चढउतार आले. या चढउताराच्या काळात आम्ही सर्वांनी पक्षवाढीसाठी एकदिलाने काम केले. यापुढेही जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत राहणार आहे. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत आणि भविष्यातही राहणार आहोत असे सांगत हे तुम्हाला आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असा उद्विग्न सवालही त्यांनी यावेळी मीडियाला केला.








