सभापती रमेश तवडकर यांनी साधला ‘तरुणभारत’शी संवाद : श्रमधाम संकल्पना राबविण्यात कार्यकर्त्यांचे मोठे योगदान
पणजी : “मी गावातून आलोय, गावच्या लोकांची जीवन जगण्याची झालेली धडपड, होरपळ, अडचणी, गरीबी उघड्या डोळ्यांनी पाहिलीय, अनुभवलीय. काबाडकष्ट करून एकमेकांना आधार व धीर देणारी माणुसकी व गावाचे गावपणही अनुभवलेय. पण, आजच्या धकाधकीच्या जीवनात काही प्रमाणात ही माणुसकी, गावपण कुठेतरी हरवत चाललेय ही खंत आहे. तरीही गावाच्या साथीने आणि मदतीने गावपण, माणुसकी सुरक्षित राहण्यासाठीच अभिनव अशी ‘श्रमधाम संकल्पना’ कष्टकऱ्यांच्या, स्वत:हून श्रमदानात पुढे आलेल्यांच्या साथीने पूर्णत्वास येत आहे, याचे समाधान वाटते”, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. दै. ‘तरुण भारत’ कार्यालयाला काल सोमवारी सदिच्छा भेट दिल्यानंतर सभापती तवडकर यांनी दिलखुलास संवाद साधला. संपादक सागर जावडेकर, जाहिरात व्यवस्थापक रवींद्र पाटील, संपादकीय विभाग प्रमुख राजू भिकारो नाईक, ज्येष्ठ पत्रकार विजय मळीक, उपसंपादक राजेश परब, प्रतिनिधी संदीप कांबळे, शैलेश तिवरेकर, छायापत्रकार तुळशीदास राऊळ व अन्य सहकारी उपस्थित होते.
… तोच खरा सुशिक्षित माणूस
सभापती तवडकर म्हणाले, गावातील काही लोक शिकले, सवरले खरे. पण, कालांतराने ते ज्यावेळी नोकरी किंवा इतर कामा-धंद्यानिमित्त शहरात गेले त्यावेळी त्यांनी आपल्या गरजा मर्यादित न ठेवता त्या वाढवल्या आणि त्यातच ते गुंतले. त्यामुळे आज ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी सोडविण्याविषयी त्यांच्याकडून जी अपेक्षा होती ती काहीप्रमाणत फोल ठरत आहे. ही आमची शोकांतिका आहे. पण, गावासाठी, गावपण जपण्यासाठी ज्याच्या शिक्षणाचा उपयोग होईल, तोच खऱ्या अर्थाने सुशिक्षित होय, असे आपले ठामपणे मत असल्याचे सभापती तवडकर म्हणाले.
काबाडकष्ट करून एकमेकांना आधार देत सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचे काम पूर्वीचे लोक करीत होते. ही भावना आजही ग्रामीण भागात म्हणजे काणकोण या ठिकाणी आहे. ही भावना पुन्हा वाढीस लागण्यासाठी ‘श्रमधाम संकल्पना’ आपण पुढे आणली. गावातील गावकऱ्यांनी आपल्याच गावातील गरीब ग्रामस्थांसाठी एकदिवस श्रम आणि एक ऊपया द्यावा, ही अपेक्षा आपण ठेवली. ज्या गावकऱ्याला राहण्यासाठी हक्काचे घर नव्हते त्याला ‘एकतरी स्वत:चं घर असावं, तोडकं, मोडकं पण ते आपलं असावं,’ ही भावना आपण गावकऱ्यांमध्ये ऊजवली. त्याला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज शेकडो लोक एकत्र येऊन श्रमधाम संकल्पनेत स्वत:हून सहभागी होत आहेत. आपल्या गावच्याच बंधुंसाठी किंवा भगिनीसाठी स्वत:हून श्रमधाम करीत आहेत, ही गावासाठी किंबहुना काणकोण तालुक्यासाठी जमेची बाजू असल्याचे सभापती तवडकर म्हणाले. श्रमधाम संकल्पना राबविण्यात कार्यकर्त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही आर्थिक बोजा पडू न देता केवळ त्यांच्या श्रमदानातून हे कार्य पुढे नेत असल्याचे तवडकर यांनी सांगितले.
काणकोणवासीयांत ऊजवला आपलेपणा
काणकोण हा काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या लोकांचा तालुका. या तालुक्यातील ग्रामीण भागात आपलेपणा आजही जीवंत आहे, त्याला फक्त आयाम देण्याचे काम आपण केले. राजकीय स्वार्थ किंवा नाव व्हावे, यासाठी श्रमधाम संकल्पना राबविण्यात येत नसून, जी अत्यंत गरीब आणि बेघर लोक आहेत, अशांना घराच्या स्वप्नांची किनार पूर्ण होण्यासाठी आपण चालवलेले हे प्रयत्न आहे. ही संकल्पना मांडताना आपण सर्वांना सामावून घेतले. राजकीय विरोध असलेले, आपले समर्थकही या संकल्पनेत यावे यासाठी त्यांच्यात आपलेपणा आणला. आज प्रत्येकजण हातात हात घालून काम करीत आहे, असे सभापती तवडकर म्हणाले.
पुढे सरसावले हजारो हात
काणकोणात श्रमधाम संकल्पना सत्यात उतरण्यासाठी केवळ माझे एकट्याचे श्रेय नसून, हजारो हात पुढे सरसावल्याने हे शक्य झाले आहे. आज कोणकोणात वीज खात्यातील कर्मचारी, पोलीस खात्यातील काही लोक, ‘स्वयंपूर्ण मित्र’ विविध संस्थाही स्वत:हून श्रमदानासाठी पुढे येत आहेत. ही अभिनव संकल्पना आता केवळ काणकोणपुरती मर्यादित राहणार नसून, राज्यातील प्रत्येक मतदारसंघापर्यंत ती पोहचेल, असा विश्वास सभापती तवडकर यांनी व्यक्त केला.
मे महिन्यापर्यंत मिळणार गरीबाला आसरा
काणकोणात सध्या श्रमधाम योजनेद्वारे अत्यंत गरीब असणाऱ्या कुटुंबांची 20 घरे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. सुरवातीला 14 घरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु ते 20 घरापर्यंत पोहचले असून, ह्या सर्व घरांचे काम सुमारे 60 ते 70 टक्के झाले पूर्ण झाले असून, येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व घरांचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सभापती तवडकर यांनी दिली.
काणकोण तालुका व्यसनमुक्त करण्याचा ध्यास
श्रमधाम संकल्पना यशस्वी होत असतानाच काणकोण तालुक्याला व्यसनमुक्त करण्याचाही आपला ध्यास आहे. काणकोणात मद्यपान करणाऱ्या लोकांचे मनपरिवर्तन करण्याचे काम सुरू असून, भविष्यात काणकोण तालुका हा व्यसनमुक्त तालुका असेल आणि यालाही लोक साथ देतील, असा विश्वास सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केला.









