भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष,जी.पं. सदस्य धाकू मडकईकर यांचे प्रतिपादन
पणजी : गोवा अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला चार विधानसभा मतदारसंघासाठी आरक्षण देण्याचा जो निर्णय राज्यातील भाजप सरकारने घेतला आहे आणि 2027 पर्यंत समाजाला हे आरक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितल्याने त्यांच्यावर आम्हाला व एसटी समाजाला पूर्ण विश्वास आहे, अशी भूमिका उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या सेंट लॉरेन्स मतदारसंघाचे सदस्य तसेच भाजप अनुसूचिती जमाती मोर्चाचे राज्य उपाध्याक्ष धाकू मडकईकर यांनी मांडली. पणजी येथे भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दक्षिण गोव्याचे जनरल सेक्रेटरी सुरेश केपेकर उपस्थित होते. धाकू मडकईकर म्हणाले, समाजाच्या काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एसटी समाजाला आरक्षण देण्यासंबंधी केलेली मागणी ही रास्तच आहे. पण, विद्यमान भाजप सरकारने ही मागणी पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले असल्याने 2027 पर्यंत एसटी समाजाला आरक्षण मिळणारच आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याबाबत जे समाजातील काही घटकाकडून बोलले जात आहे, ते योग्य नसल्याचेही ते म्हणाले. भाजप सरकारने आतापर्यंत एसटी समाजासाठी खूप मोठे कार्य केले आहे. त्यामुळे भाजपवर किंबहुना मुख्यमंत्री सावंत यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सुरेश केपेकर म्हणाले, एसटी समाजबांधवांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा जो पवित्रा घेतला तो योग्य नसून, मतदानाचा हक्क हा पवित्र आहे आणि तो गमावू नये. समाजाला विधानसभा मतदारसंघातील चार जागांवर आरक्षण देण्याबाबतचा निर्णय भाजप लवकरच घेणार आहे, त्यामुळे केवळ धीर धरावा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे एसटी समाजबांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.









