ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले आहे. आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सोमवारी अजित पवार यांनी दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्त होते. मात्र, हे वृत्त अजित पवारांनी फेटाळले होते. पण आता अजित पवार यांनी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध बंड करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालय अपात्र ठरवेल, असे गृहीत धरून मुख्यमंत्री शिंदे यांच्या जागी अजित पवारांची वर्णी लागू शकते. योग्य वेळ येताच ते या आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द करणार असल्याचे समजते.
दरम्यान, अनेक आमदार उघडपणे अजित पवारांना पाठिंबा देत आहेत. पण थोरल्या पवारांकडून त्यांना रोखण्याचे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते.








