रिक्त पदे भरण्याबाबतच्या उदासिनेतचा परिणाम : घोळ घालणाऱ्यांना नगराध्यांनी धरले धारेवर,आठ दिवसांत माहिती सादर करण्याचे निर्देश
मडगाव : मडगाव पालिकेत रिक्त पदे भरण्याच्या बाबतीत उदासिनता दाखविली जात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतील 13 रिक्त पदे मार्चपर्यंत भरणे आवश्यक होते. मात्र प्रशासकीय विभागाकडून बेफिकीरपणा चालू आहे. आतापर्यंत अशा प्रकारामुळे तब्बल 129 पदे रद्दबातल झाली आहेत. प्रशासकीय विभागातील वरिष्ठ कारकून हा सगळा घोळ घालत असल्याचे दिसून आल्याने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला आणि घोळ घालणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आठ दिवसांच्या आत सर्व रद्द झालेल्या पदांसंदर्भातील माहिती आपल्यासमोर ठेवण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी सदर घोळ घालणाऱ्या कारकुनाला दिले आहेत. त्या कारकुनाला ‘मेमो’ देण्याचे निर्देशही प्रशासकीय अधिकारी अभय राणे यांना दिले आहेत.
सोमवारपर्यंत माहिती देण्याचा आदेश
मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो यांना नगराध्यक्षांनी लक्ष घालण्याचे निर्देश दिले. जी पदे रद्द झाली आहेत त्यांची संपूर्ण यादी सविस्तर माहितीसह आपणास सोमवारपर्यंत देण्याचे निर्देश सदर महिला कारकुनाला देण्यात आले आहेत. ही यादी माहितीसह पालिका संचालकांना सादर करून सदर पदे पुन्हा भरण्यासाठी परवानगी घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले. मुख्य कारकून, कनिष्ठ कारकून, वरिष्ठ कारकून, शिपाई, कामगार, मेसन, मार्केट निरीक्षक अशी विविध स्वऊपांतील 116 पदे रद्द झाल्याने नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना हे का व कसे झाले यासंदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तरी असता जानेवारी आणि फेब्रुवारीत आणखी 13 पदे रद्द झाल्याने नगराध्यक्ष शिरोडकर खूपच भडकले आहेत. अशा प्रकारचा बेफिकीरपणा आपण यापुढे खपवून घेणार नसल्याचे त्यांनी प्रशासकीय विभागाला बजावले आहे.









