मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार प्रवीण आर्लेकर प्रयत्नशील : सुदीप ताम्हणकर
पेडणे : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी स्टॅण्ड लवकरच अधिसूचित होणार असून त्या दृष्टीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची दोन दिवसापूर्वी बैठक झाली. या बैठकीत मोपा विमानतळावर पेडणे तालुक्यासाठी खास टॅक्सी स्टॅण्ड अधिसूचित करण्यासाठीचे आदेश वाहतूक खात्याचे अधिकारी, जीएमआर कंपनीचे अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे आंदोलन आम्ही स्थगित केला आहे मात्र सरकारी पातळीवर चालढकल झाल्यास आंदोलनाबाबत निर्णय घेणार असल्याचे टॅक्सी संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकारांकडे बोलताना सांगितले. मोपा विमानतळावर टॅक्सी स्टॅण्ड अधिसूचित झाल्यानंतर पहिल्यांदा 200 पेडण्यातील टॅक्सी गाड्या ज्यांच्याकडे टॅक्सी बॅचेस आणि ज्यांनी पीसीपीओ फॉर्म वाहतूक खात्याच्या टॅक्सी व्यवसाय संबंधी भरलेला आहे त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि ज्या कोणी अजूनही फॉर्म भरले नाही त्यांनी ते फॉर्म भरावे असे आवाहन यावेळी सुदीप ताम्हणकर यांनी केलेले आहे.
200 पेक्षा जास्त गाड्या असतील तर त्याच्यासाठी आम्ही परत मुख्यमंत्री आणि सरकारकडे जादा गाड्यांसाठी स्थान द्यावे अशी मागणी करणार आहोत. मात्र जे पेडणेतील टॅक्सी बांधव आहे त्यांनी पीसीपीओ अर्ज भरावा. टॅक्सी व्यवसाय काउंटरसाठी सुऊवातीला पाच लाख ऊपये भरावे लागणार आहेत. तो खर्च 200 टॅक्सी व्यावसायिकांकडून शुल्क आकारून ते भरले जाईल आणि त्याच्यानंतर जे काही ठराविक प्रती भाडे शुल्क आहे ते भाड्यातून वजा करून जी.एम.आर कंपनीला टॅक्सी व्यावसायिक देतील. अशी माहिती सुदीप ताम्हणकर यांनी दिली. सरकार, मुख्यमंत्र्यावर आपला पूर्ण विश्वास असून पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आलेकर यांनी पुढाकार घेऊन हा विषय पुढे नेलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पेडणेतील टॅक्सी बांधवांना चांगले दिवस येणार असून पेडणेकरांची गेली अनेक महिन्याची मागणी मान्य होणार असल्याचे सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकारांकडे बोलताना सांगितले. यावेळी सुदीप ताम्हणकर यांच्यासोबत ऊपेश क्रुमरलकर, राजू नर्से, राहुल कोलवाळकर तसेच अन्य टॅक्सी व्यवसायिक उपस्थित होते.









