नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक विश्वनाथ दळवी, आनंद नाईक, माजी नगरसेवक विद्या पुनाळेकर, विन्सेंत फर्नांडिस यांचा समावेश : कृषीमंत्री रवी नाईक यांचे रितेश व रॉय हे दोन्ही पुत्र रिंगणात
फोंडा : फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवार 17 रोजी तब्बल 31 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगराध्यक्ष रितेश रवी नाईक, त्यांचे बंधू रॉय रवी नाईक, फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी, नगरसेवक आनंद नाईक, माजी उपनगराध्यक्ष विन्सेंत पॉल फर्नांडिस, माजी नगरसेविका विद्या पुनाळेकर आदींचा त्यात समावेश आहे. बहुतेक उमेदवारांनी सोमवारचा दिवस निवडल्याने तिस्क फोंडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासून उमेदवारांची एकच गर्दी उडाली. शांतीनगर प्रभाग 1 मधून फोंड्याचे आमदार तथा कृषी मंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांनी अर्ज भरला असून ते भाजपाचे उमेदवार आहेत. याच प्रभागातून राजेंद्र नारायण नागवेकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. कुरतरकरनगर प्रभाग 2 मधून राजेश सिनाय तळावलीकर यांनी उमेदवारी भरली असून नगरसेविका गीताली तळावलीकर यांचे ते पती आहेत. महिलांसाठी आरक्षीत असलेल्या सांताक्रूज प्रभाग 3 मधून भाजपातर्फे ज्योती अरुण नाईक यांनी तर त्यांच्या विरोधात शेरॉल डिसोझा व वॅरोनिका सुकोरिना डायस यांनी उमेदवारी भरली आहे. यशवंतनगर प्रभाग 4 मधून भाजपातर्फे संदीप घाडी आमोणकर यांनी तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून नारायण मणेरीकर यांनी अर्ज दाखल केला आहेत. ओबीसीसाठी राखीव असलेल्या खडपाबांध व दाग प्रभाग 5 मधून नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे. याच प्रभागातून श्रवण सत्यवान नाईक व सुशांत गुरुदास कवळेकर यांनी अर्ज भरले आहेत. खडपाबांध प्रभाग 6 मधून नगरसेवक विलीयम आगियार यांच्या पत्नी लेविया फर्नांडिस तर भाजपातर्फे शौनक बोरकर यांनी उमेदवारी भरली आहे. खडपाबांध प्रभाग 7 मधून फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी यांनी अर्ज भरला असून या प्रभागातून ते तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. महिलांसाठी आरक्षित असलेल्या वारखंडे प्रभाग 8 मधून विद्या नितीन नाईक या भाजपातर्फे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून सोनाली सुदेश नाईक यांनी अर्ज भरला आहे. प्रभाग 9 मधून माजी उपनगराध्यक्ष विसेंत पॉल फर्नांडिस तसेच भाजपातर्फे रुपक शंभू देसाई व निशांत आर्सेकर या अन्य एका उमेदवाराने अर्ज भरला आहे. ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग 10 मध्ये माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शांताराम कोलवेकर यांच्या पत्नी दीपा कोलवेकर व मनस्वी परेश मामलेदार तसेच पूजा कुश नाईक या तिघा उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. महिलांसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग 11 मधून कु. प्रियांका नवनाथ शेट पारकर व माजी नगराध्यक्ष शैलेंद्र शिंक्रे यांच्या कन्या शुभलक्ष्मी शिंक्रे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रभाग 12 मधून विराज सप्रे, अॅड. सांताना कार्दोजा व आशित वेरेकर या तिघांनी अर्ज भरले आहेत. प्रभाग 13 मधून माजी नगरसेविका विद्या पुनाळेकर व दर्शन श्याम नाईक यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रभाग 14 मधून नगरसेवक आनंद नाईक यांनी उमेदवारी भरली असून ते दुसऱ्यांना निवडणूक लढवित आहेत. या प्रभागातून आत्तापर्यंत एकच अर्ज भरण्यात आला आहे. महिलांसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग 15 मधून माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांची मुलगी कु. संपदा नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
15 प्रभागांसाठी आत्तापर्यंत 40 उमेदवारी अर्ज
निर्वाचन अधिकारी रघुराज फळदेसाई यांनी सर्व उमेदवारांचे अर्ज स्वीकारले. त्यांना साहाय्यक निर्वाचन अधिकारी विमोद दलाल यांनी साहाय्य केले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मंगळवार 18 एप्रिल हा शेवटचा दिवस असल्याने अजून काही उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत एकूण 15 प्रभागातून चाळीस उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र नगराध्यक्ष रितेश नाईक व रॉय नाईक हे रिंगणात आहेत. भाजपातर्फे बहुतेक सर्व प्रभागामध्ये उमेदवार निश्चित झाले असून काँग्रेस व मगो पक्षाने अद्याप आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र त्यांनी बहुतेक प्रभागामध्ये आपले उमेदवार निश्चित केले आहेत. काही जणांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.









