राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर : आज अधिकृत अर्ज भरणार : निपाणीत पत्रकार परिषद
निपाणी : काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याची तयारी केलेल्या उत्तम पाटलांनी ऐनवेळी ‘पवार’फुल खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उत्तम पाटील यांना बी फॉर्म देण्यात आला असून मंगळवारी ते समर्थक व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी रात्री 8 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. प्रारंभी माजी नगराध्यक्ष विलास गाडीव•र यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना प्रा. सुभाष जोशी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तम पाटील यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुढे येण्याची संधी दिल्याबद्दल आपण त्यांचे व राष्ट्रवादीच्या पदाधिक्रायांचे आभार मानतो. पवार यांनी अधिकृतपणे उत्तम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून पक्षाचा बी फॉर्म दिला आहे. त्यामुळे उत्तम पाटील समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगितले.
युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, आपण काँग्रेस उमेदवारी मागितली होती. ती न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घ्यावी, असा आग्रह समर्थक व कार्यकर्त्यांचा होता. त्यानुसार सर्वप्रथम कागल येथे आपण आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. जयंत पाटील यांनी शरद पवार यांना आपल्यासंदर्भात सांगितले व भेटीची वेळ मागितली. त्याप्रमाणे आपण मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी आपले काम पाहून सकारात्मक प्रतिसाद देत कामाला लागण्यास सांगितले. यानंतर पवार दिल्लीला गेले. तेथून मुंबईत परतल्यानंतर पुन्हा आपल्याला बोलावून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार पक्षाचा बी फॉर्म मिळाला असून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आपण अर्ज दाखल करणार आहोत. शरद पवार यांची संपूर्ण देशात जी छबी आहे आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आपल्याला निवडणुकीत लाभ होणार आहे, असे सांगितले. पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते गोपाळ नाईक, अशोककुमार असोदे, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, शौकत मनेर, शेरू बडेघर, राजू पाटील-अकोळ, दत्तात्रय नाईक, दीपक सावंत, संजय पावले, दिलीप पठाडे, अनिस मुल्ला, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, अरुण निकाडे, के डी पाटील, शिरगुप्पी ग्रामपंचायत अध्यक्ष आनंदा कुंभार, निरंजन पाटील, गजानन कावडकर, शिरीष कमते, इम्रान मकानदार, प्रा. सचिन खोत, अनिल संकपाळ, लक्ष्मण आबणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार निपाणीत सभा घेणार
यावेळी बोलताना उत्तम पाटील यांनी, शरद पवार यांनी आपल्या कामाचे कौतुक करत पक्षाची उमेदवारी देत प्रोत्साहन दिले आहे. त्याबरोबरच त्यांनी आपण स्वत? निपाणीत प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले आहे. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर पवार आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी जो विश्वास दाखवला त्याला पात्र राहून विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त केला.









