उमेदवार, समर्थक, कार्यकर्त्यांची वर्दळ : तहसीलदार कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बेळगाव सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंघांची आणि पर्यायाने उमेदवारांची संख्यादेखील अधिक आहे. विधानसभेच्या अर्ज भरणी प्रक्रियेला 13 एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात उमेदवार समर्थक आणि कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. जिल्ह्यात 18 मतदारसंघांसाठी उमेदवारांची अर्ज भरणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. शिवाय वेगवेगळ्या स्तरावर तयारी सुरू झाली आहे. गुरुवार दि. 20 एप्रिल रोजी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसांत अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामीण मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची व्यवस्था तहसीलदार कार्यालयात करण्यात आली आहे. तर शहरातील दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांसाठी महापालिका कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मनपा आणि तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अर्ज स्वीकारताना उमेदवारांबरोबर 10 अनुमोदक आवश्यक आहेत. त्यामुळे कार्यालयात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवार अर्ज भरण्यासाठी दाखल होऊ लागल्याने आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. तहसीलदार कार्यालयाकडे केवळ पादचाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. शिवाय खबरदारी म्हणून प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात आहे. एकूणच निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयात उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे गल्लीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर बॅरिकेड्स लावून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. परिणामी तहसीलदार कार्यालयात इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. शिवाय वाहतूक बंद केल्याने येथील व्यापाऱ्यांनाही फटका बसू लागला आहे. विशेषत: शासकीय कागदपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. प्रवेशद्वारावरच बॅरिकेड्स लावण्यात आल्याने नागरिकांची हेळसांड होऊ लागली आहे.









