मुंबई, पुणे, दिल्ली या महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा नसल्याने प्रवाशांचे हाल : पूर्वीप्रमाणे विमानसेवा सुरू करा
बेळगाव : बेळगाव विमानतळावरील विमानांच्या संख्येत घट झाल्याने याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवर होत आहे. यामुळे आपसूकच विमानतळावर आधारित उद्योगधंद्यांनाही फटका बसू लागला आहे. त्यामुळे विमानांची संख्या पूर्वीप्रमाणेच वाढवावी, अशी मागणी प्रवाशांसोबतच व्यावसायिकांमधूनही होत आहे. राज्यातील सर्वात जुने विमानतळ बेळगावमध्ये आहे. वर्षभरापूर्वीपर्यंत बेळगावमधून प्रत्येक महिन्याला 35 ते 40 हजार प्रवासी प्रवास करीत होते. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, म्हैसूर, कडप्पा यासह इतर शहरांना विमानसेवा सुरू होती. परंतु तांत्रिक कारणे देत विमान कंपन्यांनी एकेक सेवा बंद केली. सध्या हातावर मोजण्याइतपत विमानसेवा सुरू आहेत. परंतु या सर्वांचा फटका प्रवासीसंख्येला बसलाआहे. विमानतळावर विमानांची संख्या वाढल्याने संबंधित विमान कंपन्यांनी स्थानिकांना रोजगार मिळवून दिला. याचबरोबर विमानतळावर अनेक स्टोअर्स सुरू करण्यात आले. वाहतुकीसाठी रिक्षा, टॅक्सी याचबरोबर इतर खासगी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. सध्या मात्र विमानांची संख्या कमी झाल्याने या सर्वच व्यवसायांवर परिणाम जाणवत आहे. व्यवसाय कसा करायचा? असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. सध्या बेंगळूर, तिरुपती, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर यासह इतर शहरांना विमानसेवा सुरू असली तरी मुंबई, पुणे, दिल्ली या महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे एक तर गोवा अथवा हुबळी येथून प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने बेळगावमधूनच सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
निवडणुकीमुळे खासगी विमानफेऱ्या वाढल्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेतेमंडळी बेळगाव जिल्ह्यात प्रचारासाठी दाखल होत आहेत. याचबरोबर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पक्षांचे बडे नेते विशेष विमानाने बेळगावात दाखल झाले होते. यामुळे प्रवासी वाहतूक करणारी विमाने कमी झाली असली तरी खासगी विमानफेऱ्या मात्र वाढल्या आहेत. त्यामुळे आतातरी राजकीय व्यक्तींनी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.









