ग्रा. पं. सदस्यांना धरले धारेवर : पाणीपुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी : 24 तास पाणीयोजना राबविण्याचे ग्रा. पं. चे आश्वासन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
घरोघरी 24 तास नळांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीने खोदाई केलेल्या पाईपलाईन कामामुळे गेल्या 20 ते 25 दिवसांपासून कलमेश्वर गल्ली व लक्ष्मी गल्लीमधील नळांना पाणीपुरवठा बंद आहे. म्हणून या गल्लीतील नागरिकांनी सोमवारी ग्रा. पं. वर धडक मोर्चा काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित ग्रा. पं. सदस्यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ला घरोघरी सर्व नागरिकांनी 24 तास पाणी मिळण्याच्या योजनेसाठी शासनाकडून 8 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे गावामध्ये 24 तास पाणीपुरवठ्याची पाईपलाईन घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाईपलाईन खोदाई करतेवेळी एखाद्या ठिकाणी पाईप फुटल्यास लगेच प्लंबरला बरोबर घेऊन फुटलेली पाईप लगेच दुरुस्त केली असती तर अशी परिस्थिती झाली नसती. परंतु, ग्रा. पं. नेही दक्षता न घेता जेसीबीने खोदाई सुरू ठेवली. त्यामुळे पाईप फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. परंतु, वरील पाईप दुरुस्तीची दक्षता घेऊन काम केले असते तर नागरिकांना पाणीही मिळाले असते व खोदाईचे कामही सुरू राहिले असते, अशा प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांतून उमटत होत्या.
ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्षांसह पीडीओही अनुपस्थित
कलमेश्वर गल्लीतील नागरिक सोमवारी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रा. पं. वर मोर्चाने गेले. यावेळी पाण्याची अडचण सांगण्यासाठी सभागृहामध्ये गेले असता ग्रा. पं. अध्यक्षा, उपाध्यक्ष व पीडीओबरोबर इतर सदस्यही अनुपस्थित असल्याचे दिसून आले. तेव्हा आपली ही अडचण आम्ही सांगणार कुणाला? असेही प्रश्न यावेळी उपस्थित नागरिकांतून व्यक्त होताना दिसत होते.
ग्रा. पं. ने खोदाई काम संपेपर्यंत ट ँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी
श्र् ााr कलमेश्वर गल्ली व लक्ष्मी गल्लीतील नागरिकांना नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. कारण या भागात विहिरींना शेवाळ पाणी असते. यामुळे ते पाणी आंघोळी किंवा पिण्यासाठी योग्य नसते. यामुळे या गल्लीतील नागरिकांना नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. यासाठी खोदाई काम पूर्ण होईपर्यंत ग्रा. पं. ने कलमेश्वर गल्ली व लक्ष्मी गल्लीतील नागरिकांसाठी टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांनीही सहकार्य करण्याचे ग्रा. पं. चे आवाहन
कंग्राळी बुद्रुक गावाला घरोघरी 24 तास पाण्यासाठी शासनाकडून 8 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सध्या खोदाई करून पाईप घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आम्ही लक्ष्मी गल्लीतील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे सुरू ठेवले आहे. कलमेश्वर गल्लीमध्येही टँकरने पाणीपुरवठा करू. तसेच ज्या ठिकाणी पाईप फुटल्या आहेत, त्यांची दुरुस्ती करून पाणी सुरू करू. एकदा 24 तास पाणीपुरवठा योजना सुरू झाली म्हणजे सर्वांना दररोज ताजे पाणी मिळणार आहे. तेव्हा नागरिकांनीही थोडा धीर धरून 24 तास घरोघरी पाणी योजना पूर्ण करेपर्यंत ग्रा. पं. ला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.









