सर्व साहित्य बीएसएनएल इमारतीमध्ये हलविले
बेळगाव : बेळगाव आरटीओ कार्यालयाच्या जुन्या इमारतीचे बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे तेथील कार्यालयीन कामकाज बीएसएनएलमधील कार्यालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, मागील 15 दिवसांपासून हे स्थलांतराचे काम सुरू होते. त्यामुळे कामकाजाला कधी सुऊवात होणार? याकडे लक्ष लागून राहिले होते. आता स्थलांतराचे काम पूर्ण झाले असून कामकाजालाही सुऊवात झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर सर्कल येथील आरटीओ इमारत जीर्ण झाली होती. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी गळत होते. त्यामुळे येथील इमारत हटवून हायटेक इमारत बांधण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परिवहनने हा प्रस्ताव मंजूर करत या ठिकाणी आधुनिक इमारत बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता येथील इमारत पाडवून नवीन बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तेथील सर्व साहित्य बीएसएनएलमधील इमारतीत हलविण्यात आले आहे. तब्बल 15 दिवस साहित्य हलविण्याचे काम सुरू होते. जुनी कागदपत्रे व इतर साहित्य सुस्थितीत ठेवण्यात आले आहे. तसेच संगणक व इतर साहित्यही बसविण्यात आले आहे. मागील 15 दिवस साहित्य हलविण्यात येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. येथील 70 टक्के कर्मचारी बीएसएनएल ऑफिसमध्ये तर 30 टक्के कर्मचारीवर्ग यमनापूर येथील कार्यालयात हलविण्यात आला आहे. दोन वर्षांपर्यंत बीएसएनएलमध्येच आरटीओ कार्यालयाचे कामकाज चालणार आहे. सध्या हळूहळू येथील कामकाजाला गती देण्यात आली आहे.









