
कारवार ; गेल्या तीन-चार दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात सोमवारी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन केले. कारवार-अंकोला मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि भाजपच्या उमेदवार रुपाली नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी मंत्री प्रमोद माधवराज, विधानपरिषद सदस्य गणपती उळवेकर, कारवार नगराध्यक्ष डॉ. नितीन पिकळे, जगदीश बोरकोडीकर उपस्थित हेते. नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मालादेवी मैदानापासून निवडणूक कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीत हजारो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणुकीपूर्वी रुपाली नाईक यांनी मालादेवीची पूजा-अर्चा केली.
कारवार मतदारसंघातून माजी आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार सतीश सैल यांनीही सोमवारी उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते शंभू शेट्टी, रमाकांत नायक, प्रभाकर मालसेकर उपस्थित हेते. सैल यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी कोडीबाग येथील खापरी देवस्थानापासून निवडणूक कार्यालयापर्यंत मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन केले. कुमठा मतदारसंघातून माजी आमदार शारदा शेट्टी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली. कुमठा मतदारसंघातून सूरज नाईक सोनी यांनी निजदच्या तिकीटावर उमेदवारी दाखल केली. दरम्यान, हल्याळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे पूत्र प्रशांत देशपांडे यांच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. य् ााशिवाय हल्याळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि माजी आमदार सुनील हेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे वडील माजी विधानपरिषद सदस्य व्ही. एस. हेगडे उपस्थित होते.
अन्य मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज
भटकळ मंकाळू वैद्य (काँग्रेस), मोहम्मद झाबरूद खतीब (अपक्ष), योगेश नाईक (उत्तम प्रजाकीय पक्ष), यल्लापूर मतदारसंघ व्ही. एस. पाटील (काँग्रेस), शिरसी मतदारसंघ भीमण्णा नाईक (काँग्रेस), हितेंद्र नाईक (आम आदमी पार्टी) तसेच कुमठा मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार दिनकर शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे आदी उपस्थित होते.









